गुन्हे वार्ता

अक्‍कलकुव्‍याच्‍या मक्राणीफळीत दोन गट भिडले; परस्‍परांवर दगड-विटा, लाठ्या-काठ्यांचे वार, सात जण गंभीर जखमी, २१ जणांवर गुन्‍हा

अक्‍कलकुवा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आगामी सण-उत्‍सव शांततेत पार पडावेत, यासाठी सगळीकडे शांतता समितीच्‍या बैठका पार पडत असतानाच नंदुरबार जिल्‍ह्याच्‍या अक्‍कलकुवा येथे मात्र दोन गटांत किरकोळ कारणावरून दंगल उसळली. दोन्‍ही गटांनी परस्‍परांवर लाठ्याकाठ्यांचे वार तसेच दगड विटांचा मारा केला. यात सात जण जखमी झाले असून, सांडपाणी जाण्‍याच्‍या ठिकाणी सिमेंटचे बांधकाम करणे, हे या हाणामारीचे कारण ठरले.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अक्‍कलकुवातील मक्राणीफळी भागातील आयटीआयच्‍या मागे राहणार्‍या मक्राणी आणि बलोच कुटुंबांसह शेजार्‍यांत सांडपाणी सोडण्‍याच्‍या जागेवर सिमेंटचे बांधकाम केल्‍याच्‍या मुद्द्यावरून जोरदार भांडण झाले. सुरूवातीला झालेल्‍या या वादावादीचे रूपांतर काही क्षणांतच जोरदार हाणामारीत झाले आणि दोन्‍ही गट परस्‍परांवर चाल करून गेले. हाती येईल त्‍या साहित्‍याने दोन्‍ही गटांकडून परस्‍परांवर हल्‍ला करण्‍यात येत होता. प्रारंभी लाथाबुक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित असलेल्‍या भांडणात दोन्‍ही गटांतील लोकांनी नंतर परस्‍परांवर दगड विटांचा मारा, लाठ्याकाठ्यांनी वार केले.
सात जण झाले जखमी
रविवारी (दि.१५) सकाळी दहा वाजेच्‍या सुमारास सुरू झालेली ही हाणामारी दुपारपर्यंत सुरूच होती. या तुंबळ हाणामारीत एकूण सात जण जखमी झाले असून, यात एका गटातील आसिफ शब्‍बीर मक्राणी, जयतुबाई रामजी वळवी, मोहम्‍मद तलहा आसिफ मक्राणी, सकिना शब्‍बीर मक्राणी (सर्व रा. मक्राणीफळी, अक्‍कलकुवा) हे चौघे तर दुसर्‍या गटातील मकसूद अहमद हारूण बलोच, जुनेद रफिक मक्राणी, सुफिया रफिक मक्राणी (सर्व रा. आयटीआयच्‍या मागे, मक्राणीफळी, अक्‍कलकुवा) या तिघांचा समावेश आहे.
परस्‍परविरोधात तक्रारी
अखेर संध्‍याकाळी दोन्‍ही गटांकडून परस्‍परांच्‍या विरोधात अक्‍कलकुवा पोलिस ठाण्‍यात तक्रारी नोंदविण्‍यात आल्‍या. मक्राणी कुटुंबातील फौजियाबी सुलतानअली मक्राणी (२५) यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून मकसूद हारूण बलोच, सुफिया रफिक बलोच, मकबुल हारूण बलोच, जुनेद रफिक बलोच, लाला उर्फ युसुफ हारूण बलोच, साजिद मकबुल बलोच, बिलाल मकसूद बलोच, जाकिर रफिक बलोच, साकिर रफिक बलोच, साबीर रफिक बलोच, इमरान हारूण बलोच, उवेद हारूण बलोच, रशिदा मकसूद बलोच (सर्व रा. आयटीआयच्‍या मागे, मक्राणीफळी, अक्‍कलकुवा) यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला. तर दुसर्‍या गटातील मकसूद अहमद हारूण बलोच (५०) यांच्‍या तक्रारीवरून विरोधी गटातील सुलतानअली लियाकतअली मक्राणी, शाहरूख शब्‍बीर मक्राणी, आसिफ शब्‍बीर मक्राणी, शाकीर शकीर मक्राणी, राजू रामजी वळवी, भिका जेरमुन्‍या वसावे, अनिता रामजी वळवी, सोन्‍या भिका वळवी (सर्व रा. आयटीआयच्‍या मागे, मक्राणीफळी, अक्‍कलकुवा) या आठ जणांविरोधात भारतीय न्‍यायसंहितेच्‍या विविध कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. अक्‍कलकुवा पोलिस ठाण्‍याचे पोलिस निरीक्षक सारंग नवलकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्‍स्‍टेबल रामजी गावित या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्‍यान, या घटनेनंतर सध्‍या या भागात शांतता असून, कुणीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button