नंदुरबार जिल्हा

राँग साईड भरधाव बसची दुचाकीला धडक; युवकाचा जागीच मृत्यू; नंदुरबारच्या ठाणेपाडा घाटात भीषण दुर्घटना

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर बसस्थानकात बसने महिलेला चिरडल्‍याची घटना ताजी असतानाच आता नंदुरबार तालुक्यातही एका बसने युवकाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगात रॉंग साईड धावणाऱ्या बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा घाटातील दुसऱ्या वळणावर हा भीषण अपघात घडला.
हर्षल रोहिदास साळुंके (रा. छळवेल कोर्डे, ता. साक्री, जि. धुळे) असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून, संबंधित बसचालकाच्या विरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल साळुंके हा फिर्यादी उमेश विजय बागुल (२७, रा. निमगुळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे) याची दुचाकी (क्र. एमएच १८ सीके ६०९६) घेऊन नंदुरबारकडे जात होता. दरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास ठाणेपाडा घाटातील दुसऱ्या वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने (क्र. एमएच १४ एक्यू ०२४८) रॉंग साईड भरधाव वेगात येत त्याच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यामुळे हर्षल रस्त्यावर फेकला जाऊन त्याच्या शरीरावर जबर जखमा झाल्या. यात काही वेळातच त्याने प्राण सोडला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी इतरांच्या मदतीने हर्षलचे शव नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवले. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात संबंधित बस चालकाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोहेकॉ रमेश कडवे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button