प्रकाशात चोरट्यांचा उच्छाद; किराणा दुकाने टार्गेट, एकच दुकान तीन आठवड्यांत दोनदा फोडले, मंदिरही सोडले नाही; व्यापारी संतापले; घटना सीसीटीव्हीत कैद

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील प्रकाशा गावात चोरीच्या वाढत्या घटनांनी आता परिसीमा गाठली असून, चोरट्यांनी किराणा दुकानांना टार्गेट केल्याने व्यापारी संतापले आहेत. दुसरीकडे, चोरट्यांनी आता मंदिरातही लूट केल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने व्यापारी वर्गात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे यातील काही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्या असून, चोरट्यांचा निर्भीडपणा पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास मराठे गल्लीतील गणेश गोरख मराठे यांच्या सप्तशृंगी माता किराणा दुकानात प्रवेश करून ६ हजार रुपयांची रोकड लांबवण्यात आली होती. यानंतर शिवशक्ती कॉलनीतील पटेल यांच्या दुकानात शिरून तेथेही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही प्रकरणात कार्तिक उर्फ बोक्या राजू जावरे व अन्य एकावर शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता १२ मार्च रोजी पुन्हा मराठे यांचे दुकान फोडण्यात आले. सोबतच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या या शहरात १२ मार्चच्या रात्रीच केदारेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या अन्नपुर्णा मातेच्या मंदिरातही चोरट्यांनी डल्ला मारला. येथे चोरी गेलेल्या वस्तूंची नोंद घेण्याचे काम आज मंगळवारी (दि. १४) दुपारी उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, चोरट्यांनी आणखी एका ठिकाणी देखील चोरीचा प्रयत्न केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, १२ मार्चला मराठे यांच्या दुकानात झालेली चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, चोरटे कोणतीही भीती न बाळगता अत्यंत शांतपणे चोरी करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. या घटनेमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी नाराजी व्यापाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. “पुरावा असूनही कारवाईला विलंब होत असेल, तर ही चिंतेची बाब आहे,” असा सूर व्यापाऱ्यांतून उमटत आहे.
चोरीच्या सलग घटनांमुळे बाजारपेठेत अस्वस्थता वाढली असून, पुढील घटना टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, तसेच संबंधित चोरट्यांना तात्काळ जेरबंद करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, आता पोलिस प्रशासनासमोर चोरट्यांचा त्वरीत शोध घेऊन नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.



