नंदुरबार जिल्हा

शहादा शहराचा श्वास कोंडला; जागोजागी वाहतूक कोंडी, ‘नो एन्ट्री’चा फज्जा, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षाने वाहनधारक वैतागले!

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर वळण घेत असून, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ‘नो एन्ट्री’च्या नियमांची उघडपणे पायमल्ली, बेशिस्त पार्किंग, रस्त्यावर अतिक्रमण आणि पोलिसांचा अपुरा बंदोबस्त यामुळे शहराचा श्वास अक्षरशः कोंडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नगरपालिका कार्यालय या मार्गावर एकेरी वाहतुकीचा नियम लागू असतानाही वाहनचालकांकडून त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. खेतिया रस्त्यावरून पालिका कार्यालयाकडे येणाऱ्या ‘नो एन्ट्री’ मार्गावरही अनेक वाहनचालक बिनधास्तपणे वाहने घुसवत असून, संबंधित ठिकाणी वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती या समस्येला अधिकच खतपाणी घालत आहे.
स्‍थानिक रहिवाशांच्‍या म्हणण्यानुसार, वाहतूक पोलीस केवळ अधूनमधून मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करतात; मात्र त्यात सातत्य नसल्याने नियमभंग करणाऱ्यांवर कोणताही वचक राहिलेला नाही. “महिन्यातील काही दिवसच पोलिसांची उपस्थिती दिसते, उर्वरित काळ रस्ते बेशिस्तीच्या हवाली असतात,” अशी संतप्त प्रतिक्रियाही स्‍थानिकांनी व्यक्त केली.
शहरातील अरुंद रस्त्यांवर बेशिस्त पार्किंग आणि रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या फळभाज्यांच्या गाड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. परिणामी पादचारी, रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाहनचालक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली असल्याची टीका होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना, अतिक्रमण हटविण्याची मोहीम, नियमित पोलिस बंदोबस्त आणि ‘नो एन्ट्री’ नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
नियम फक्त फलकापुरते राहणार की प्रत्यक्षात राबवले जाणार, असा सवाल उपस्थित करीत प्रशासनाने या विषयात तातडीने लक्ष न घातल्‍यास तीव्र आंदोलनाचा इशाराही स्‍थानिक रहिवाशांनी दिला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button