वाढीव कर घ्या, पण दुकानांसाठी पाच फूट जागा वाढवून द्या; चर्मकार समाजाची शहादा उपनगराध्यक्षांकडे मागणी; माधवी पाटील म्हणाल्या, सकारात्मक विचार करते

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील खेतिया रोड चार रस्ता परिसरात ५० वर्षांपासून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या चर्मकार समाज बांधवांनी आपल्या व्यवसायाची जागा वाढवून मिळावी, या मागणीसाठी पालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवी मकरंद पाटील यांना शुक्रवारी (दि. २४) सविस्तर निवेदन दिले. चर्मकार समाजाचे अध्यक्ष आणि सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले. उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी या प्रश्नी सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
खेतिया रोड चार रस्ता भागात, पाण्याच्या टाकीच्या दक्षिण दिशेला चर्मकार समाजाची बूट-चप्पल दुरुस्ती आणि विक्रीची छोटी दुकाने आहेत. ही दुकाने साधारण ४x४ क्षेत्रफळाची असून, या बदल्यात ते नियमितपणे नगरपालिकेकडे कर भरणा देखील करत आले आहेत. मात्र, सध्याची ४ बाय ४ ची जागा व्यवसायासाठी अत्यंत अपुरी पडत असल्याने व्यावसायिकांची कुचंबणा होत आहे.
ग्राहकांची गैरसोय, रहदारीचा प्रश्न
जागेच्या कमतरतेमुळे व्यावसायिकांना साहित्य ठेवण्यास अडचण येते. ग्राहकांना रस्त्यावर उभे राहून सेवा घ्यावी लागते. यामुळे उन-पावसाचा त्रास तर होतोच, शिवाय रस्त्यावर वाहने उभी राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ही समस्या सोडवण्यासाठी दुकानांच्या मागे असलेल्या पालिकेच्या पाण्याच्या टाकीकडील रिक्त जागेपैकी किमान ५ फूट जागा वाढवून मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पालिकेचे नुकसान नाही, कर भरण्यास तयार
पाण्याच्या टाकीला लागून पक्के बांधकाम नसल्याने ही ५ फूट जागा वाढवून दिल्यास पालिकेचे तांत्रिक नुकसान होणार नाही. उलट, जागा वाढवून मिळाल्यास नगरपालिका नियमानुसार वाढीव वार्षिक कर भरण्यास सर्व चर्मकार व्यावसायिक तयार आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण थांबेल आणि शिस्तबद्ध व्यवसाय होऊ शकेल, असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन देताना चर्मकार समाजाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक हिरालाल सोमा अहिरे, सचिव तुकाराम गबा अहिरे यांच्यासह प्रकाश मोतीलाल अहिरे, मंगल चिंधू अहिरे, चिंधू गिरधर अहिरे, गुताबाई फकीर अहिरे, मनोज अर्जुन अहिरे, चंद्रकांत लक्ष्मण अहिरे, सुभाष चिंतामण अहिरे, गबा चिंतामण अहिरे, गोविंद मधुकर अहिरे, सुमनबाई मधुकर अहिरे, सोनू गोपाल अहिरे यांसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.



