यशासाठी केवळ हुशारी नव्हे, सातत्य अन् मेहनतही आवश्यक : अभिजित पाटील; ‘विमलाई’च्या विकास टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंतांचा केला गौरव

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी फक्त हुशारी पुरेशी नसते, तर सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रामाणिक मेहनत आवश्यक असते. लहानपणापासूनच अभ्यासाची सवय लावून घेतली, तर मुलांना पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी करणे सोपे जाते. अपयश आले तरी निराश न होता पुढे जाणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच, सातत्य, शिस्त आणि मेहनत या गुणांचा आपल्या जीवनात समावेश करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शहाद्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले.
येथील विकास प्रतिष्ठान संचलित विमलाई करिअर अकॅडमी अंतर्गत घेण्यात आलेल्या विकास टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा येथील विश्रामकाका पाटील शैक्षणिक संकुलात पार पडला. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरून पाटील बोलत होते. यावेळी तालुका एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पटेल, विकास प्रतिष्ठानचा अध्यक्षा प्रीती पाटील, संस्थेचे तज्ञ संचालक प्रा. एस.पी. पाटील, पालक, संस्थेच्या विविध विद्या शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक उपस्थित होते.
स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकून राहावा, बालवयापासूनच त्याला स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी यासाठी तालुका एज्युकेशन संस्थेच्या विविध विद्या शाखांमध्ये विकास प्रतिष्ठान मार्फत यंदा प्रथमच विकास टॅलेनुसार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या गौरव
यावेळी संस्थेच्या शहादा, प्रकाशा, कहाटूळ, फेस व वडाळी या पाचही विद्या शाखांमधील पहिली ते चौथीच्या ६१० व पाचवी ते दहावीच्या १७५० असे एकूण २३६० विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी, एकाच वेळी कॅमेराच्या निगराणीत भयमुक्त वातावरणात प्रथमच व्हीटीएस स्पर्धा परीक्षा दिली होती. या परीक्षेत इयत्ता निहाय प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पालकांसमवेत गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वला गुजर यांनी तर सूत्रसंचालन चंद्रमणी रायसिंग यांनी केले. यशस्वीतेसाठी व्हिटीएस टीमने सहकार्य केले.
“बालवयापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती मिळावी, त्याचे ज्ञान मिळून सराव व्हावा, त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना देण्यासाठी त्याचबरोबर उत्तम करिअर, चांगली नोकरी, पदव्युत्तर चांगला अभ्यासक्रम, मानसन्मान, प्रतिष्ठा, पारितोषिके, बक्षिसे इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होते. शिवाय विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास व सर्वांगीण विकासाला चालना मिळते.”
– प्रिती अभिजीत पाटील (अध्यक्षा विकास प्रतिष्ठान, शहादा)



