गुन्हे वार्ता

अबब! : शहाद्यात तब्बल २१७ ओके अवैध दारू जप्त; चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या तस्करीचा ‘एलसीबी’कडून पर्दाफाश!; २९ लाखांच्या मुद्देमालासह एकाला बेड्या

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादामार्गे चोरट्या मार्गाने गुजरात चाललेला दारूचा मोठा साठा नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) जागरूकतेमुळे महाराष्ट्रातच रोखण्यात यश आले आहे. एलसीबीने या तस्करीचा पर्दाफाश करताना अवैध विदंशी दारूच्या बाटल्याने भरलेले तब्बल २१७ खोके जप्त करीत एकाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅनमधून (क्र. एमएच १४ जीडी ७४९७) विदेशी दारूने भरलेल्या बाटल्यांचे काही खोके शहादामार्गे गुजरात राज्यात नेले जात असल्याची गुप्त माहिती खबर्‍याकडून एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शुक्रवारी (दि. २४) भल्या पहाटे खबऱ्याकडून मिळाली होती. पाटील यांनी क्षणाचीही उसंत न घेता तातडीने ही माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या कानावर घातली. त्यांनीही तातडीने पाटील व सहकाऱ्यांना कारवाई करण्याच्या आदेश दिले.
अन्‌ ’तो’ जाळ्‍यात अडकला
यानंतर हेमंत पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या पथकाला या माहितीची खात्री करण्यासाठी पाठवले. पथकाने तातडीने शहादा शहरातील शिरूर चौफुलीजवळ शहादा-प्रकाशा रस्त्याच्या कडेला सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संबंधित पिकअप वाहन पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास शहादातून प्रकाशाकडे येताना पथकाला दिसले. पथकाने वाहन चालकाची चौकशी केल्यावर त्याने आपले नाव देवेंद्र खुमाराम मेघवाल (२६, रा. रूपवास धोडीवाडी बास ढाणी सोजत, ता. सोजत, जि. पाली, राजस्थान) असल्याचे सांगितले. तो वाहनातील वस्‍तूंबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पथकाचा संशय अधिकच बळावला आणि त्यांनी वाहनाची तपासणी सुरू केली.
यावेळी वाहनात अवैध दारू नाही भरलेल्या बाटल्यांचे तब्बल २१७ खोके आढळल्याने एलसीबीचे पथकही अवाक झाले. पोलिसांनी सदरील दारूच्या बाटल्या आणि संबंधित वाहन असा २८ लाख ८७ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी देवेंद्र खुमाराम मेघवाल याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली यशस्‍वी कामगिरी
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोहेकॉ मोहन ढमढेरे, पोना विकास कापुरे, पोकॉ शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले यांच्या पथकाने केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button