सगळेच म्हणताहेत की गॅस सिलिंडर टंचाई नाही, पण तळोद्यातील हा फलक बरंच काही सांगून जातोय, फलकावर काय लिहिलेय, वाचा…

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस टंचाई निर्माण झाल्यानंतर सरकारने अनेक नियमांत बदल करून परिस्थिती पूर्वपदावर आणली. आता महाराष्ट्रासह देशभरात कुठेही घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई नसल्याचे सांगण्यात येत असले तरी तळोदा शहरात मात्र एका व्यक्तीने भर चौकात लावलेल्या एका फलकावर लिहिलेल्या मजकुराने घरगुती गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आणल्या आहेत.
अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेले हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या युद्धामुळे सगळीकडेच घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाली होती. पण नंतर ही स्थिती सरकारच्या उपाययोजनांमुळे परिस्थिती पुन्हा बदलली. असे असले तरी तळोदा शहरात मात्र वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याने स्थानिकांचा उद्वेग दिसून येत आहे.
शहरात अजूनही स्थानिक रहिवाशी तत्काळ सिलिंडर मिळावे यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. यामुळे एजन्सी परिसरात दिवसभर सिलिंडर घेण्यासाठी रांग पाहायला मिळत आहे. अनेकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे तळोदा शहरवासीयांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
फलकावर मजकूर लिहून निषेध
दरम्यान, शहरात गॅस सिलेंडर तुटवड्याच्या निषेधार्थ एका स्थानिक नागरिकाने स्मारक चौकात फलक लावून गॅस सिलिंडर न मिळाल्याचा निषेध करीत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. “माझा सिलिंडर सिंगल आहे. मी २३ मार्चला सिलिंडर नोंदवला आहे, तरी मला अजून सिलिंडर मिळत नाही. १ एप्रिलला नोंदणी झालेले ग्राहक सिलेंडर घेऊन गेले. मी २० तारखेपासून दररोज फिरत आहे. गाडी आल्यावर भेटून जाईल असे सांगितले जाते, तरीही सिलिंडर मिळत नाही. माझी तब्येत बरोबर राहत नाही, माझ्या प्रकृतीला तुम्ही जबाबदार राहणार“, असा मजकूर या फलकावर नमूद करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित गॅस एजन्सीकडून पुरवठ्यातील अडचणी व तांत्रिक कारणांमुळे विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. तर आता भरचौकातील या फलकामुळे प्रशासन जागे होऊन घरगुती गॅस सिलिंडर व्यवस्थेतील त्रुटी दूर करेल, अशी अपेक्षाही स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.



