‘धिंड’ पॅटर्न आता नंदुरबारमध्येही : बारमधील बहुचर्चित खुनातील आरोपींना पोलिसांचा दणका; पाच आरोपींना हातात बेड्या घालून शहरभर ‘मिरवले’!

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : विघातक कृत्ये करून शहर व जिल्ह्यातील शांतता धोक्यात आणणार्या गुन्हेगारांची धिंड काढण्याचा पॅटर्न राज्यभरात पोलिसांकडून राबविला जात आहे. हाच कित्ता गिरवित नंदुरबार पोलिसांनी शहरातील हॉटेल व्यवस्थापकाच्या खूनप्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपींची शहरातून धिंड काढत त्यांची शहरभरातून ‘मिरवणूक’ काढली. या आरोपींची धिंड काढून भाईगिरी करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिल्याची चर्चा रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून एका गटाने हॉटेल व्यवस्थापकाला बेदम मारहाण केली होती. या जबर मारहाणीत संबंधित व्यवस्थापकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत अवघ्या काही तासांत पाच आरोपींना अटक केली होती.
यानंतर पोलिसांनी आरोपींना हातात बेड्या ठोकून शहरातून धिंड काढत कठोर संदेश दिला. पोलिस बंदोबस्तात या पाचही आरोपींची धिंड काढण्यात आल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गुन्हेगारी प्रवृत्ती आणि भाईगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
विशेष म्हणजे, आरोपींची धिंड काढत पोलिसांनी आपण ॲक्शन मोडमध्ये असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. या कारवाईमुळे सामान्यांकडून समाधान व्यक्त होत असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याची भावना बळकट झाली आहे. खूनप्रकरणातील पुढील तपास उपनगर पोलीस करत असून या प्रकरणात आणखी धागेदोरे तपासले जात आहेत. नंदुरबार पोलिसांच्या या कारवाईची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.



