गुन्हे वार्ता

सकाळी शहादा, रात्री नवापूर : मद्यतस्‍करांवर एलसीबीची झडप सुरूच; झाडाझुडपात लपवून ठेवलेल्‍या दारूसह चार वाहने जप्‍त; ९३ लाखांचा मुद्देमाल लागला हाती; सूत्रधार मात्र फरार

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शुक्रवारी (दि. २४) भल्‍या पहाटे शहादा येथे एका वाहनासह दारूच्‍या बाटल्‍यांनी भरलेले २१७ खोके असा सुमारे २९ लाखांचा मुद्देमाल जप्‍त करणार्‍या पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) याच दिवशी रात्री उशिरा नवापूर तालुक्‍यात आणखी एका अवैध दारू तस्‍करीच्‍या मोठ्या तस्‍करीचा पर्दाफाश केला. एलसीबीने रायपूर शिवारातील टेकडीच्या आडोशाला झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवलेला विदेशी दारूसाठा आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी चार चारचाकी वाहने असा तब्बल ९२ लाख ७८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असले तरी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार भावीन कोकणी मात्र पोलिसांच्‍या हाती लगेच लागू शकला नाही. आता त्‍याच्यासह इतरांचा शोध सुरू आहे.
रायपूर येथील भावीन कोकणी हा आपल्या घराशेजारील शेतालगतच्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा अवैध साठा करून त्याची वाहनांद्वारे वाहतूक करीत आहे, अशी माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली तत्‍काळ कारवाईचे नियोजन करण्यात आले.
टेकडीच्या आडोशाला छापा,  आरोपींची पळापळ
एलसीबी पथकाने गुप्त माहितीची खातरजमा करून रायपूर शिवारातील एका लहान टेकडीशेजारी झाडाझुडपांमध्ये तयार केलेल्या खाचेमध्ये छापा टाकला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचे बॉक्स आणि चार वाहने आढळून आली. पोलिसांचा सुगावा लागताच काही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने पाठलाग करून धर्मेश मंगू धोडी (३६, रा. एकलारा, जि. वलसाड, गुजरात) याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत या संपूर्ण साठ्याचा संबंध भावीन कोकणी याच्याशी असल्याचे समोर आले आहे.
चार वाहने जप्त
कारवाईदरम्यान एमएच ०४ एफझेड ६६९८, जीजे १९ बीई ८१०९, जीजे ०२ सीएल १२५४ आणि एमएच ३९ जे ३००० ही चार वाहने जप्त करण्यात आली. या सर्व वाहनांमध्ये विदेशी दारूचे बॉक्स भरलेले होते. दारूसाठा आणि वाहने असा एकूण ९२.७८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई), १०८ आणि ८३अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीसह फरार संशयितांचा शोध सुरू आहे.
यांनी केली कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पोउपनि विकास गंजाळ, पोहेकॉ जितेंद्र तांबोळी, जितेंद्र तोरवणे, बापू बागुल, नितीन गांगर्डे, दिनेश चित्त, मुकेश तावडे, मनोज नाईक, विशाल नागरे, अजित गावीत, सचिन वसावे आदींचा सहभाग होता.
सीमावर्ती भागात अवैध दारू तस्करीला आळा?
गुजरात सीमेलगतचा नवापूर परिसर अवैध दारू वाहतुकीसाठी संवेदनशील मानला जातो. अशा पार्श्वभूमीवर एलसीबीने केलेली ही मोठी कारवाई दारू तस्करांसाठी मोठा धक्का मानली जात असून, सीमावर्ती भागातील त्‍यांच्‍या नेटवर्कवर अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button