भाविकांच्या सुरक्षेची काळजी : बॉम्बशोधक पथकाने केदारेश्वर मंदिराचा प्रत्येक कोपरा तपासला!
प्रकाशा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र प्रकाशामधील केदारेश्वर मंदिराची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॉम्बशोधक पथकाने मंदिराचा प्रत्येक कोपरा तपासून सर्व काही सुरळीत असल्याची खात्री करून घेतली.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशामधील सर्वच महादेव मंदिरांमध्ये पूजा-अर्चा, अभिषेक आणि लघु रुद्रसाठी भाविकांची मोठी गर्दी होती. येथे केदारेश्वर, काशी विश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, गौतमेश्वर, मुक्तेश्वर ही प्रमुख महादेव मंदिरे आहेत. यासह शहरातील इतरही महादेव मंदिरांवर सध्या विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
शनिवारी अचानक नंदुरबार येथून आलेल्या बॉम्बशोधक पथकाने केदारेश्वर मंदिराची तपासणी सुरू आली. यावेळी पथकाने दोन्ही मंदिरांचा संपूर्ण परिसर, सभामंडप, मंदिरांचा गाभारा, मंदिरांची मागील बाजू, तसेच पुष्पदंतेश्वर मंदिर येथील प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली. यावेळी केदारेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांची उपस्थिती होती.
दरम्यान, महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रकाशा येथील ओम शांती केंद्राच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी केदारेश्वर मंदिरासमोर भव्य मंडप टाकण्यात आला आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेला १२ ज्योतिर्लिंगांचा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. याशिवाय ओम शांती केंद्राच्या प्रमुख मोना दीदी यांच्याकडून महाशिवरात्र आणि १२ ज्योतिर्लिंगाचे महत्व भाविकांना सांगितले जात होते. दुसरीकडे, महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रकाशा शहर आणि परिसरात मांस विक्री पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती.तशी सूचनाच सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मांस विक्री करणाऱ्यांना केली होती.



