उपवास महागला : शेंगदाणे सव्वाशे तर भगरीचा दर किलोला दीडशे पार; फळे खाणेही परवडेना!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महाशिवरात्रीचा उपवास तर करायचा पण शेंगदाणे, भगर आणि फळेही खरेदीला परवडेनात, अशी सामान्यांची अवस्था रविवारी पाहायला मिळाली. शेंगदाण्याचा दर १३० रुपयांच्या घरात पोहोचला असून, उपवासाच्या अन्य पदार्थांच्या दरातही मोठी वाढ झाल्याने अनेकांना महाशिवरात्रीचा उपवास ‘निरंकार’ करावा लागला.
महाशिवरात्रीला उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून उपवासाच्या पदार्थांचे दर गगनाला भिडले असून, विशेषतः शेंगदाणे, भगर आणि तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. महिनाभरापूर्वी १०० रुपये किलो मिळणाऱ्या भगरीचा दर गेल्या महिनाभरापासून २० ते ३० रुपयांनी वाढला आहे. राजगिराच्या दरातही किलोमागे साधारणतः १० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात राजगिरा ११० रुपये किलो दराने विकला जात आहे. पेंडखजूरही किलोला २० रुपयांनी महागली असून, द्राक्ष, सफरचंद आणि इतर फळेही साधारणतः १५० रुपये रुपये किलो दराने विकत घ्यावे लागत आहेत. याशिवाय बटाटे ३० रुपये तर रताळे ५० रुपये किलो या दराने विकत घ्यावे लागत आहेत. या महागाईत सध्या केवळ साबुदाणा सामान्यांना थोडा दिलासा देत आहे. दिवाळीपासून साबुदाण्याचे दर स्थिर असून, सध्या साबुदाण्याचा दर ५० ते ६० रुपये किलो असा आहे.
सर्वाधिक महागाई शेंगदाण्याची
गेल्या वर्षभरात सर्वाधिक दरवाढ शेंगदाण्याची झाली आहे. गेल्या एक वर्षाचा विचार केला तर शेंगदाण्याचा दरात किलोमागे तब्बल ५० रुपयांच्या घरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी महाशिवरात्रीच्या काळात ७५ ते ८० रुपये किलो दराने विकले जाणारे शेंगदाणे आता थेट १३० रुपये किलो या दराने विकले जात आहेत. स्थानिक आवकमध्ये झालेली घट, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी आणि त्यामुळे वाढलेली निर्यात ही शेंगदाण्याच्या दरवाढीची प्रमुख करणे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
