नंदुरबारमध्ये वाळू माफियांची दादागिरी; भर रस्त्यावर तहसीलदारांना धक्काबुक्की!; दोन तरुणांविरोधात गुन्हा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अवैध धंद्यांविरोधात आजवर प्रशासनाकडून न झालेल्या कारवाईचा फटका आता थेट नंदुरबारच्या तहसीलदारांनाच बसला आहे. प्रशासनाकडून न होणाऱ्या कारवाईमुळे शहर आणि जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूकदारांची हिंमत ‘सातवे आसमान पर’ पोहोचली असून, वाळू माफियांच्या टोळीतील दोन तरुणांनी चक्क नंदुरबारच्या तहसीलदारांसह त्यांच्या पथकालाच धक्काबुक्की केली. या प्रकरणी दोन्ही तरुणांवर गुन्हा दाखल झाला असला तरी भर रस्त्यावरच हा प्रकार घडल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात अवैध धंदे फोफावले असून, प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने हे धंदे चालविणाऱ्यांची हिंमत वाढतच चालली आहे. विशेषतः वाळू माफियांनी अवघा जिल्हा पोखरण्याचे काम सुरू ठेवले असून, अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने बेदरकारपणे रस्त्यावरून धावत असल्याने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अपघातही वाढले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर नंदुरबारचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी या वाळू माफियांविरोधात कारवाईसाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत पवार भरारी पथकासह शहरातील सीबी पेट्रोल पंपाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत होते. ही कारवाई सुरु असतानाच अचानक गौरव सुरेश महिरे (२२) व पंकज राहुल बाविस्कर (२६, दोघेही रा. पहेलवान नगर, नंदुरबार) हे दोघे तेथे आले. त्यांनी या कारवाईला विरोध करीत पवार व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांशी वाद घालायला सुरूवात केली. पथकातील कर्मचारी त्यांना समजून सांगत असतानाच या दोघांनी त्यांच्यावर अरेरावी करीत थेट पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली आणि शासकीय कामकाजात अडथळा आणला.
बराच वेळ हा प्रकार सुरू राहिल्याने त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. अखेर काही काळानंतर तहसीलदार पवार यांनी या प्रकरणी दोन्ही तरुणांविरोधात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अहिरे व बाविस्कर या दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद केली.
दरम्यान, आजवर अवैध धंद्यांविरोधातील कारवाईदरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना विरोध करणाऱ्यांची आता थेट तहसीलदारांना धक्काबुक्की करण्यापर्यंत हिंमत वाढल्याने घडलेल्या प्रकारची जोरदार चर्चा शहरात सुरु होती. आता या प्रकारानंतर वाळू माफियांविरोधातील कारवाईला ब्रेक लागतो की या कारवाईची धार आणखी वाढते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.



