दहा हजारांच्या बदल्यात एक लाख देतो म्हणत ९० हजारांना लुटले; पोलिसांनी सहा जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याला संपर्क साधायचा, मग त्याला थोड्या पैशांच्या बदल्यात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लुटायचे असा कारनामा करणारी एक टोळी नंदुरबार पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. पंजाबमधील एका व्यक्तीला १० हजारांच्या बदल्यात एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून या टोळीने ९० हजारांना लुटले होते. पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकतानाच त्यांच्याकडून दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमालाही जप्त केला आहे.
समशेर उर्फ नानदाद रमेश भोसले (३०), कमरेश राष्ट चव्हाण (२४), प्रभू बालिश पवार (२९), परेशलाल उगलाल चव्हाण (२०), गुलुपसी हाटादजी भोसले (३५) आणि अमित उर्फ टाटा रुबाब पवार (२९) अशी या लुटारुंच्या टोळीतील सहा जणांची नावे असून, हे सर्वच जण साक्री तालुक्यातील जामदे येथील रहिवासी आहेत.
या टोळीने सर्वात आधी सोशल मीडियाचा वापर करून पंजाबच्या होशियारपूर येथील परमिंदरसिंग अमरजितसिंग या फास्टफूड व्यावसायिकाशी ओळख निर्माण केली. मग त्यांच्याशी जवळीक वाढवली. यासाठी त्यांना काही व्हिडीओ पाठवले. हे व्हिडीओ पाहून परमिंदरसिंग प्रभावित झाले.
यानंतर टोळीने त्यांच्यापुढे एक स्कीम ठेवली. या स्कीमनुसार १० हजार रुपये गुंतवल्यास त्या बदल्यात एक लाख रुपये मिळतील, असे आमिष सिंग यांना दाखवण्यात आले. मात्र त्यासाठी नंदुरबार येथे यावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार सिंग आणखी एकासह नंदुरबार येथे आले. येथे आल्यावर टोळीने त्यांना नंदुरबार ते साक्री रस्त्यावरील आष्टे गावाजवळील टेकडीवर नेले. तेथे पोहोचताच टोळीने सिंग व त्यांच्या सहकाऱ्याला मारहाण करून आणि शस्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैसे व मोबाईल असा ९० हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. यानंतर त्यांना तेथून हाकलून देण्यात आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सिंग यांनी हिंमत दाखवून नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करीत हे प्रकरण तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) देण्यात आले. एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील व तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश भदाणे यांच्या पथकाने योग्य दिशेने तपास करीत या टोळीच्या मुसक्या आवळल्या.



