भुजबळांनी थेट सुनावले : विलिनीकरणाची घाई अन त्यावर चर्चाच नको, नवीन कॅप्टन हा विषय व्यवस्थित हाताळतील!
मुंबई ((नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. दोन्ही गटांतून दिवसाकाठी एक तरी नेता या विषयावर बोलताना दिसत आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र या विषयावर चर्चा करणाऱ्यांना आपल्या शैलीत फटकारले आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई आणि त्यावर चर्चा कशाला सुरु आहे तेच कळत नाही. आम्ही आमचा नवा कॅप्टन निश्चित केला आहे. हा कॅप्टनच या विषयावर अंतिम निर्णय घेईल, अशा शब्दांत भुजबळ यांनी या विषयावर थेट भाष्य केले. एवढेच नाही तर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करणे हाच आपला अजेंडा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख यांच्यासह पक्षातील काही नेत्यांनी तर 12 फेब्रुवारीला स्वतः अजित पवार विलिनीकरणाची अधिकृत घोषणा करणार होते, असे म्हटले होते. तर अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही विलिनीकरणासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही. हा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले होते. आता या विषयीच्या चर्चांवर अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी देखील सडेतोड भूमिका मांडली आहे.
भुजबळ म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची रोजच चर्चा सुरू आहे. पण विलिनीकरण करायचे तर आज काय आणि महिनाभराने काय कधीही करता येईल. त्याची घाई करण्याचे काही कारण नाही. सुनेत्राताई आता उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करतोय. त्यानंतर विलीनीकरणाबाबत दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये चर्चा होईल, विलीनीकरण आधीच ठरले होते, असे म्हणण्यात आता अर्थ नाही. आणि माझ्यासमोर हा विषय कधी झालेला पण नाही. आता आमचे नवे कॅप्टन आले आहेत. सगळ्या आमदारांची एकत्रित बैठक होईल. या विषयावर त्यांना ठरवू द्या. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बसविणे हा माझा अजेंडा आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.
खरं – खोटं समोर येईलच
राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले आहे. यानंतर झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर भुजबळ म्हणाले, पोलीस चौकशी करतील. खरं – खोटं समोर येईलच. या प्रकरणात माझा सहभाग दिसला तर राजीनामा देईल असे स्वतः झिरवळ म्हणाले आहेत. त्यामुळे चौकशी होईपर्यंत थांबायला हवे.



