तेल, मसाला, डाळीला दरवाढीची फोडणी; सणासुदीसह लग्नसराईच्या आधीच सामान्यांचा खिसा होतोय रिकामा!
नंदुरबार ((नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : रमझान ईद, होळी हे सण आणि लग्नसराई तोंडावर असतानाच नंदुरबारच्या बाजारात मसाले, डाळी आणि तेलांच्या दराचा भडका उडाला आहे. शेंगदाणा तेल, तूरडाळ, मसाले आणि अन्य खाद्यतेलांच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत असून, महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे चित्र आहे.
नंदुरबार शहर आणि जिल्ह्यात मसाल्याच्या पदार्थांना मोठी मागणी आहे. मात्र यंदा पाऊस जास्त झाल्याने मसाल्याच्या पदार्थांच्या पिकांना मोठा फटका बसला आणि त्यांचे उत्पादन घटले. तर मिरची, धने, हळद, जिरे या पदार्थांची लागवड पाण्याखाली गेल्याने त्यांची गुणवत्ता खालावली आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या पदार्थांची बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याचा थेट परिणाम या पदार्थांच्या दरांवर झाला असून, मसाल्यांच्या जवळपास सर्वच पदार्थांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोबतच या दरवाढीला घाऊक बाजारातील दरवाढ, वाढलेला वाहतूक खर्च आणि सणांसह लग्नसराईमुळे वाढलेली मागणी या बाबीही जबाबदार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
लग्नसराईत खर्च वाढणार
लग्नसराईच्या काळात जेवणाच्या पंगती उठत असल्याने साहजिकच किराणा माल आणि मसाल्यांच्या पदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे पुढील दोन – तीन महिने किराणा आणि मसाल्यांच्या पदार्थांचे दर अधिक राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत. घाऊक बाजारातून चढ्या दराने माल विकत घ्यावा लागत असून, साहजिकच किरकोळ बाजारातही दर वाढवून विक्री करावी लागत असल्याचेही या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
पाऊस आला मोठा, पिकांचा झाला तोटा
यंदा पावसाळ्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विशेषतः मिरची, धने, हळद आणि जिरे आदींना पावसाने अक्षरशः धुवून काढले. या मसाल्यांची पिके अती पावसाने वाहून गेली. या पिकांचे जास्त उत्पादन घेतल्या जंय`जाणाऱ्या भागात जास्त पावसानंतर शेतात पाणी साचल्याने पिके कुजून गेली. त्यामुळे उत्पादन घटले आणि त्यामुळे बाजारात आवक घटली. या साऱ्यांचा परिणाम या पदार्थांच्या किमतीवर झाला आहे.
