करायचे काय? : प्रशासन निघाले ‘तोरणमाळ फेस्टिवल’ घ्यायला पण बसच नाही तिथपर्यंत जायला!; महोत्सवाला जायचे कसे, हाच सामान्यांचा प्रश्न…
शहादा (सलाउद्दीन लोहार) : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये ‘तोरणमाळ पर्यटन महोत्सव होऊ घातला आहे. पर्यटन वाढ हा या महोत्सवाच्या आयोजनामागील प्रशासनाचा उद्देश असला तरी सामान्यांना तेथे पोहोचण्यासाठी दळणवळणाची पुरेशी साधनेच नसल्याने या फेस्टीवलचा मूळ हेतूच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तोरणमाळची बससेवा बंद असल्याने आता या महोत्सवासाठी तोरणमाळ गाठायचे तरी कसे असा प्रश्न आता सामांन्य पर्यटकांना पडला आहे.
तोरणमाळ येथे पर्यटन वाढीसाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यातूनच येत्या 20 ते 22 फेब्रुवारी असे तीन दिवस पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून तोरणमाळ येथे तोरणमाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या तारखा जाहीर होताच महोत्सवाबाबत काहीच कल्पना दिल्याने आमदार आमश्या पाडवी प्रशासनावर चिडले होते. नंतर प्रशासनाने समजूत काढल्यानंतर त्यांचा राग शांत झाला. त्यानंतर महोत्सव आयोजनाच्या कामांना वेग आला.
या महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सर्व प्रशासकीय विभागांची बैठक घेऊन महोत्सवाच्या आयोजनात कोणत्याही कमतरता राहू नये असे सक्त आदेश दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास कार्यक्रमस्थळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गर्दी नियंत्रण तसेच वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सहायक जिल्हाधिकारी, तळोदा, महावितरण, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक, स्वच्छता निरीक्षक, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम या विभागांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या सोविण्यात आल्या आहेत.
मात्र, गेल्या दीड वर्षांपासून तोरणमाळ क्षेत्राची बससेवा बंद आहे. यामुळे स्थानिकांना म्हसावद, शहादा गाठण्यासाठी खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागतो. शिवाय बससेवा बंद असल्याने तोरणमाळ पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. बससेवा बंद असतानाही महोत्सव होत असल्याने आता सामान्य पर्यटकांना आकर्षित करायचे असे प्रश्न प्रशासनाला पडला आहे. धनदांडगे पर्यटक चारचाकी गाड्यांनी तोरणमाळ येथे पोहोचतीलही, पण सामान्यांचे काय, असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे.
मिनीबसच मिळेना
तोरणमाळ बससेवा बंद असल्याने त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी मिनीबस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. मात्र, राज्यस्तरावरून मिनीबस खरेदीचे धोरणच बंद झाल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांना खिळ बसली. काही महिन्यांपूर्वी माणिकराव कोकाटे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्हा नियोजन समितीतून बस खरेदीच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यातही पुढे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि ही मिनीबस खरेदी थांबली. आता तोरणमाळसाठी बससेवाच बंद आहे. तोरणमाळच्या सात पायरी घाटात मोठी बसच जावू शकत नाही आणि मिनीबस उपलब्ध नाही, अशा कात्रीत प्रशासन अडकले आहे. जिल्हा प्रशासनाने महोत्सवाच्या अनुषंगाने एसटी प्रश्नासनाला देखील काही आदेश दिले होते. पण त्यांनी हात वर केले आहेत. शहादा बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक हरिष भोई यांनी तोरणमाळसाठी मिनीबस नसल्याने आम्ही तिथपर्यत सेवाच देवू शकत नाही, अशा शब्दांत जिल्हा प्रशासनाला लेखी कळवले आहे. मात्र, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी सांगितले की, नंदुरबार आणि शहादा बस आगारांना राणीपूरपर्यंत बससेवा पुरविण्यास सांगण्यात आले आहे. राणीपूरहून तोरणमाळपर्यंत प्रवासी वाहतूकीसाठी आरटीओ विभागाला खासगी वाहतूकदारांची मदत घेण्यास सुचविण्यात आले आहे.



