धडगाव तालुक्यात जंगलात सुरू होती साग तस्करी; वन कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून केला पर्दाफाश!; नेमकं काय झालं वाचा…!

शहादा (सलाउद्दीन लोहार) : धडगाव तालुक्यातील बिलगाव (प्रा.) वनक्षेत्रात तस्करीच्या उद्देशाने लपवून ठेवलेला सागाचा मोठा साठा जप्त करण्यात वन विभागाच्या गस्ती पथकाला यश आले आहे. भुषा परिमंडळातील नियतक्षेत्र सावऱ्या कं. नं. ७६, मौजे बिलगाव (निलदयपाडा) येथील अतिदुर्गम जंगल भागात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, जीव धोक्यात घालून ही कारवाई केल्याने वन कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नियतक्षेत्र सावऱ्या कं. नं. ७६, मौजे बिलगाव (निलदयपाडा) येथील जंगलात तस्करीच्या उद्देशाने सागाच्या झाडांचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. क्षणाचाही विलंब न लावता बिलगाव रेंजच्या वन कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेत गस्त सुरू केली. यावेळी त्यांना विविध ठिकाणी साग दांड्यांचा साठा करून ठेवल्याचे आढळले. त्यांनी हा सुमारे २८ हजार ६७५ रुपये किमतीचे ४४ नग (घनमीटर १.१४७) साग दांडे तसेच १०५० रुपये किमतीचा एक नग साग चौपट (घनमीटर ०.०४२) असा एकूण १.१८९ घनमीटर व २९,७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महत्वाचे म्हणजे जप्त केलेला मुद्देमाल वन कर्मचाऱ्यांनी स्वतः अत्यंत दुर्गम जंगलातून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतर पायी चालत डोक्यावर वाहून आणला. रात्री उशिरा सगळा मुद्देमाल खासगी वाहनाने धडगाव टिंबर डेपो येथे नेऊन जमा करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) ड, इ, फ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास भुषा परिमंडळाचे वनपाल भरतसिंग परदेशी करीत आहेत. ही कारवाई नंदुरबार वनविभाग अंतर्गत वनसंरक्षक, धुळे (प्रा.) निनु सोमराज, उपवनसंरक्षक (नंदुरबार) संतोष सस्ते, विभागीय वनाधिकारी (दक्षता विभाग धुळे) राजेंद्र सदगीर, तसेच सहायक वनसंरक्षक (रोहयो) अक्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईचे नेतृत्व बिलगावचे वनक्षेत्रपाल (प्रादेशिक) लक्ष्मीकांत शेंडगे आणि अक्राणीच्या वनक्षेत्रपाल (प्रादेशिक) चारुशीला काटे यांनी केले. या कारवाईत प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल प्रथमेश ढाणे, वनपाल भरतसिंग परदेशी, प्रतिभा बोरसे, तसेच वनरक्षक व वनमजूरांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे साग तस्करांचे धाबे दणाणले असून, जंगलातील अवैध वृक्षतोड आणि साग तस्करी रोखण्यासाठी यापुढेही कडक कारवाई केली जाणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.



