गुन्हे वार्ता

नंदुरबारमध्ये धाडसी चोरी; नगरसेवकाचे घर फोडून १८ लाखांचा ऐवज लंपास; रोकड, दागिन्यांसह हाती येईल ते घेऊन चोरटे झाले भुर्र…

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारमध्ये घर बंद ठेवून परगावी जाणे दीपक लालचंद कटारिया या नगरसेवकाला महागात पडले आहे. कटारिया यांच्या घरात कुणीही नसल्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला आणि तब्बल १७ लाख ९३ हजार ८०० रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. यात रोख रकमेसह सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक आणि नगरसेवक असलेले दीपक कटारिया यांचे शहरातील प्लॉट नंबर ८६, गणपतीनगर येथे मोठे घर आहे. ११ ते १३ फेब्रुवारी या काळात ते कुटुंबियांसह नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. सलग तीन दिवस घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बेडरूमच्या खिडकीचा गज तोडून घरात प्रवेश केला.
तिजोरी फोडली…
नंतर चोरट्यांनी संपूर्ण घरात संचार करीत हाती लागतील त्या वस्तू चोरल्या. विशेषतः चोरट्यांनी घराच्या आतील खोलीत असलेल्या तिजोरीला लक्ष्य केले. ही तिजोरी फोडून चोरट्यांनी त्यातील रोख रक्कम तसेच दागिने चोरून पोबारा केला. यामध्ये एक लाख ९५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, ९५ हजारांची लेडीज चेन, दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट, ३ लाखांच्या डायमंड लावलेल्या सोन्याच्या बांगड्या, दोन लाख २० हजारांची कर्णफुले, ८० हजार रुपयांचे ब्रासलेट, सोन्याच्या रिंग, अंगठ्या, डायमंड लावलेल्या सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची नाणी, मोड असलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच एक लाख ४५ हजार रुपयांची रोकड असा एकूण १७ लाख ९३ हजार ५०० रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला.
पथकाकडून चोरट्यांचा माग सुरू
चोरट्यांनी थेट नगरसेवकाचे घर लक्ष्य करून धाडसी चोरी केल्याने खळबळ माजली आहे. या चोरीची माहिती मिळताच शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत श्वानपथकाला पाचारण केले. घर व परिसरातील पायचे व हातांचे ठसे घेण्यात आले. तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झालेले चित्रणही तपासण्यात आले. या चोरीच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापनाही करण्यात आली असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button