नंदुरबार जिल्हा

मद्य तस्करांनो खुशाल महाराष्ट्रात या अन जा, कारण उत्पादन शुल्क विभाग झोपला आहे; नंदुरबार जिल्ह्यात चाललंय तरी काय?

शहादा (सलाउद्दीन लोहार) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कृपेने मध्य प्रदेशातील मद्य तस्करांना नंदुरबार आणि पर्यायाने महाराष्ट्रातील प्रवेश खूपच सोपा होऊन बसला आहे. कारण जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीनही तपासणी नाके (चेक पोस्ट) ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशा अवस्थेत आहेत. काही ठिकाणी कर्मचारीच उपस्थित नाहीत, तर कुठे नाक्याच्या दरवाजाला चक्क कुलूप ठोकलेले, अशी अवस्था दिसून येत आहे. मात्र, यावर नेमका मार्ग कधी निघणार, याचे उत्तर तूर्तास तरी कुणाकडेही नसल्याचे दिसते.
नंदुरबार जिल्हा मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये वसलेला असून, मद्य तस्करांना महाराष्ट्रात प्रवेशासाठी नंदुरबार जिल्हा प्रमुख मार्ग ठरत आहे. महत्वाचे म्हणजे मध्यप्रदेशमध्ये मद्याच्या किमती महाराष्ट्राच्या तुलनेत खूपच कमी आहेत. त्यामुळे मद्य तस्कर तिकडील मद्य महाराष्ट्रात आणून चढ्या दराने विक्री करून मालामाल होतात. ही तस्करी रोखण्यासाठी नाही म्हणायला महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील अन्य राज्यांना लागून असलेल्या तीन तालुक्यांत तपासणी नाके उभारले आहेत. शहादा तालुक्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात खेडदिगर येथे, अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात सीमेला लागून असलेल्या गव्हाली आरटीओ चेकपोस्ट जवळ आणि नवापूर आरटीओ चेकपोस्ट जवळ बेडीकापाडा येथे हे तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या तिन्ही तपासणी नाक्यांच्या भागात अनेकदा मद्य तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी अनेक वेळा मद्य तस्करांवर कारवायाही केल्याचे आकडेवारी सांगते. मात्र असे असताना उत्पादन शुल्क विभागाचे एकतर कुलूपबंद राहतात किंवा उघडे असतील तेव्हा तेथे एकही कर्मचारी उपस्थित नसतो. मग हे नाके उत्पादन शुल्क विभागाने उभारले तरी कशाला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. शिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तपासणी नाके बंदच राहणार असतील, मद्य तस्करांना रोखणार कोण, हा प्रश्न अनुत्तरीतच राहत आहे.
कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या नावालाच
मध्यप्रदेशला लागून असलेल्या खेडदिगर सीमा तपासणी नाक्यावर एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यातील निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक प्रतिनियूक्तीवर धुळे येथे असून, उपनिरीक्षकाचे दुसरे पद रिक्त आहे. अधिकारीच थाऱ्यावर नसल्याने येथे तैनात कर्मचारीही या नाक्याकडे फिरकत नसल्याचे सांगण्यात येते. यातील काही कर्मचारी तर नंदुरबार येथील कार्यालयात काम करीत असल्याचे देखील सांगण्यात येते. एवढेच नाही तर येथील कर्मचाऱ्यांसाठी वरिष्ठ कार्यालयाने दिलेली गाडीही धुळीने माखली आहे.
गुजरातच्या सीमावर्ती भागाला लागून असलेल्या गव्हाली तपासणी नाक्यावरही खेडदिगर नाक्यासारखीच परिस्थिती आहे. येथील निरीक्षक पद रिक्त असू, दोनपैकी एक उपनिरीक्षक प्रतिनियुक्तीवर धुळे येथे आणि दुसरे रजा टाकून गायब आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात या तपासणी नाक्यांवर अवघी एक कारवाई होऊ शकली आणि त्यातही केवळ दारूचे २० बॉक्स उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागू शकले आहेत. नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहल सराफ यांनी मात्र अधिकारी वर्ग उपलब्ध नसल्याने सीमातपासणी नाके बंद राहत असल्याचे सांगून वरिष्ठांना याची कल्पना देण्यात आल्याची माहिती दिली. अर्थात अधिकारी नसले तरी सर्व कर्मचारी तपासणी नाक्यांवर कार्यरत असल्याचा दावा करण्यासही त्या विसरल्या नाहीत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button