धडगाव तालुक्यात भयानक दुर्घटना; महाशिव यात्रेत पालखीची कडी तुटली; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

शहादा (सलाउद्दीन लोहार) : महाशिवरात्रीनिमित्त धडगाव तालुक्यात छापरी येथे आयोजित महाशिव यात्रेत सोमवारी (दि. १६) दुर्दैवी अपघात घडला. यात्रेत रहाट पाळणा (पालखी) सुरु असतानाच या पाळण्याची कडी अचानक तुटली आणि त्यातून कोसळून १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातामुळे यात्रेत काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पंकेश तिल्या वसावे (१९ रा. छापरी, ता. धडगाव) असे या अपघातात दगावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील छापरी या गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरली होती. या यात्रेत रहाट पाळणेही आले होते. पंकेश वसावे हा यातील एका रहाट पाळण्यात बसला होता. अचानक या पाळण्याची कडी तुटली. ही कडी तुटताच पंकेश जोरात खाली कोसळला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. यात्रेत आलेल्या भाविकांनी तातडीने त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, धडगाव येथे दाखल केले.
मात्र, उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. डॉक्टरांनी पंकेशला मृत घोषित केल्याचे वृत्त यात्रेत पोहोचताच खळबळ उडाली. तरुण वयात झालेल्या पंकेशच्या अपघाती मृत्यूमुळे भाविकांकडून हळहळ व्यक्त होत असून, छापरी गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, यात्रेतील सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, पालखी व इतर धार्मिक साहित्याची योग्य तपासणी झाली होती का, याबाबत चर्चा सुरू आहे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने महाशिव यात्रेतील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशी मागणी भाविक व स्थानिकांकडून होत आहे.



