नंदुरबार जिल्हा

तहसीलदारांना धक्काबुक्की म्हणजे अति झालं; वाळू माफियांना आवरा; नंदुरबारचे महसूल कर्मचारी संतापले; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महसूल कार्यालये राहिली बंद…

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : वाळू तस्करांच्या वाढत्या दादागिरीने नंदुरबारचे महसूल कर्मचारी संतापले असून, त्यांनी कामबंद आंदोलन करून या मुजोरीचा निषेध केला. यामुळे सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील महसूल कार्यालये बंद राहिली. याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागला.
अवघ्या आठवडाभराच्या अंतराने जिल्ह्यात वाळू माफियांकडून महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या दोन घटना घडल्या. आधी वाळू माफियांनी एका महसूल कर्मचाऱ्याला लाकडी दांड्याने मारहाण केली होती. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी थेट नंदुरबारचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांच्यावर वाळू माफियांच्या टोळीतील दोन तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. हे हल्ले म्हणजे वाळू माफियांच्या वाढत्या मुजोरीचे प्रमाण असून, त्यांना वेळीच आवर घाला अशी मागणी महसूल महसूल कर्मचाऱ्यांनी केली आहे. या हल्ल्यांच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत कामबंद आंदोलन केले. एवढेच नव्हे तर या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील सादर करून वाळू माफियांवर कडक कारवाईची मागणी केली.
सगळी जबाबदारी आमचीच का?
जिल्ह्यातील वाढत्या वाळू तस्करीला आणि वाळू माफियांना आवर घालण्याची जबाबदारी फक्त महसूल कर्मचाऱ्यांचीच आहे का, असा सवाल महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केला आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना गौण खनिज वसुलीअंतर्गत उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट अवास्तव असून, महत्वाचे म्हणजे ही वसुली करताना कडक भूमिका घेऊन कारवाई करावी लागते. खरे तर अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई करण्याची संयुक्त जबाबदारी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) देखील आहे. मात्र, हे दोन्ही विभाग काहीच सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे ही कारवाई करणे एकट्या आमची जबाबदारी आहे का, असा प्रश्नही महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनातून केला आहे. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांवरील दबाव वाढतो आणि त्यांची सुरक्षितता धोक्यात येते, असे या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
कार्यालये बंद, सामान्यांना फटका
महसूल कर्मचाऱ्यांच्या काम बंद आनॊदलनामुळे सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील सर्व महसूल कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले होते. साहजिकच याचा फटका महसुलाची कामे पार पाडण्यासाठी या कार्यालयांत आलेल्या सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागला. दुरद्रुम या कार्यालयांत काम घेऊन आलेल्यांना या कार्यालयात कुणीही उपलब्ध नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button