नंदुरबारमध्ये शिवजयंती दिनी उलगडणार छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा इतिहास; सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि नंदुरबार जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येत्या १८ व १९ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि शिवरायांच्या शौर्याचा इतिहास उलगडणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.
हा दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि नेतृत्वाला आदरांजली वाहणारी ऊर्जादायी संकल्पना आहे. या सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, नागरिक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी केले आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, नंदुरबार येथे संपन्न होईल. स्थानिक युवा कलाकार गौरव माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेली ‘3D-2Way’ रांगोळी हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. या रांगोळीच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंग रेखाटले जाणार आहेत.
सांस्कृतिक मेजवानी: पोवाडे, शिव स्वरांजली
याचा महोत्सवात शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित अनेक दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या मध्ये १९ फेब्रुवारीला राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध लोकशाहीर शिवाजीराव पाटील यांचा ‘गाथा शिवरायांची’ हा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. तर ओमकार संगीत साधना विद्यालयाचे हेमंत पाटील आणि त्यांचे सहकारी ‘शिव स्वरांजली’च्या माध्यमातून शिवरायांची संगीतमय कथा सादर करतील. याशिवाय महोत्सवात महाराजांच्या पराक्रमावर आधारित विविध गीते आणि पोवाडे या महोत्सवात सादर केले जाणार आहेत.
विविध स्पर्धांचे आयोजन
युवा पिढीमध्ये ऐतिहासिक गौरव आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा आणि ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती आणि ‘किल्ले बनवा’ स्पर्धा या स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून, शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.



