नंदुरबार जिल्हा

अरे बापरे : शहादा शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; हल्ल्यात लहान मुलीसह चौघे गंभीर जखमी; नगर पालिका प्रशासनावर स्थानिक संतप्त

शहादा (सलाउद्दीन लोहार) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील सोनार गल्ली परिसरात भटक्या कुत्र्यांनी मंगळवारी सकाळीच चार जणांवर हल्ला केला. यात एका लहान मुलीचाही समावेश असून, कुत्र्यांच्या हल्ल्यात हे चौघेही गंभीर जखमी झाले आहे. भटक्या कुत्र्यांनी शहर वासियांवर केलेल्या हल्ल्याचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी काही जण सोनार गल्लीतून आपापल्या कामांसाठी जात होते. याच वेळी एक लहान मुलगीही तेथून निघालेली होती. हे सर्व जण एकटे असल्याचे पाहून भटक्या कुत्रे काही वेळाच्या अंतराने त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडले. त्यांच्या शरीराला चावे घेतले. यात हे चौघेही गंभीर जखमी झाले. आसपासच्या लोकांनी नंतर त्यांना तातडीने नगर पालिकेच्या रुग्णालयात हलवले. मात्र तेथे रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन उपलब्ध नसल्याने या सर्वांना ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथून पुढे जखमी मुलीला नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्याची वेळ आली.
नगर पालिका प्रशासन झोपेत
या घटनेमुळे शहादा नगरपालिकेचा भोंगळ आणि निष्काळजी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहादा शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, सामान्यांना रस्त्याने पायी कठीण होऊन बसले आहे. शहराच्या प्रत्येक भागातील रस्त्यांवर कुत्रे अधिक आणि माणसे कमी असे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे सारे दिसत असूनही नगर पालिकेचे प्रशासन मात्र पूर्णतः झोपेत असल्याचे नाटक करीत असल्याचा आरोप शहादावासियांकडून केला जात आहे. मंगळवारी भटक्या कुत्र्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांवर केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता जीवघेणा ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे असताना, पालिकेच्या रुग्णालयात साधे रेबीज प्रतिबंधक इंजेक्शनही उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे शहरात भटके कुत्रे खुलेआम रस्त्याने ये-जा करणाऱ्यांवर हल्ले करीत असताना अद्यापही नगर पालिका प्रशासनाने त्यांच्या बंदोबस्तासाठी काहीही पावले न उचलल्याने स्थानिक नागरिक आश्चर्य वू`व्यक्त करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज समोर येऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. भटक्या कुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का, असा प्रश्नही शहादेकर करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button