नंदुरबार जिल्हा

शहादामध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी चिमुकलीसाठी पिनाकीन पटेल ठरले देवदूत; वेळेवर उपचार मिळवून देत वाचवले प्राण

शहादा (सलाउद्दीन लोहार) : शहादावासीयांना मंगळवारी संकल्प ग्रुपचे माजी अध्यक्ष पिनाकीनभाई पटेल यांचे यांच्या रूपात प्रत्यक्ष देवदूताचे दर्शन घडले. मंगळवारी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी निधी अंबालाल पाटील (रा. करजई) ही दहा वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली होती. पटेल यांनी तत्काळ हालचाली करून या मुलीला वेळेवर उपचार मिळवून दिले. यामुळे निधीचे प्राण वाचू शकले. या अतुलनीय कार्याबद्दल पिनाकीन पटेल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंगळवारी शहादा शहरातील सराफा बाजार परिसरात मोकाट भटक्या कुत्र्यांनी काही जणांना लक्ष्य करीत त्यांच्यावर हल्ला चढवला होता. यावेळी कुत्र्यांनी त्यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले. यात निधी पाटील या चिमुकलीचा समावेश होता. लहानग्या निधीला पाहून भटके कुत्रे अक्षरशः तिच्यावर तुटून पडले होते. यावेळी कुत्र्यांनी तिला खाली पडून तिच्या खांद्यासह अन्य ठिकाणी चावा घेतला. यात तिला गंभीर जखमा झाल्या. हल्ल्यानंतर तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडून बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
याच वेळी काही कामानिमित्त तेथून जाणारे पिनाकिनभाई पटेल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न करता माणुसकीचा परिचय दिला. केवळ बघ्याची भूमिका न घेता त्यांनी आपल्या दुचाकीवरून जखमी मुलीसह व तिच्या आईला तातडीने ग्रामीण रुग्णालय शहादा येथे दाखल केले.
जेवणाची वेळ असल्याने त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टर जेवण करीत होते. मात्र, मुलीची गंभीर अवस्था पाहून डॉ. रोहन पाटील यांनी आपले जेवण तसेच सोडून तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले. तर या उपचारादरम्यान परिचारिका वर्षा ठाकरे यांनीही डॉक्टरांना सहकार्य केले. पिनाकिनभाई पटेल यांची तत्पर मदत आणि डॉक्टर व परिचारिकेने केलेल्या तातडीच्या उपचारांमुळे निष्पाप निधीचे प्राण वाचले.
जनसेवा हीच ईश्वरसेवा
या घटनेनंतर मुलीच्या आई-वडिलांनी संकल्प ग्रुप तसेच पिनाकिनभाई पटेल यांचे साश्रू नयनांनी आभार मानले. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या वाक्याची प्रचिती पाटील कुटुंबासह इतरांना या माध्यमातून पुन्हा आली. तसेच समाजात माणुसकी अजूनही जिवंत आहे, याचा प्रत्यय शहादा शहरवासीयांना या घटनेच्या माध्यमातून आला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button