नंदुरबार पोलिसांना सॅल्यूट : चोरट्यांनी डोळ्यात स्प्रे मारला; पण हिंमत न हारता त्यांच्या मुसक्या आवळल्याच!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार तालुका पोलिसांनी चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी कामगिरी केली आहे. पवनऊर्जा प्रकल्पातून कॉपर केबल चोरट्यांना पकडल्यावर त्यांची चौकशी सुरु असतानाच त्यांच्या तिसऱ्या सहकाऱ्याने चक्क पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला खरा; पण पोलिसांनी यामुळे घाबरून न जाता या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. काळमदेव ते शनिमांडळ रस्त्यावर घडलेल्या या थरारक घटनेनंतर कारवाई करणाऱ्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पवनऊर्जा प्रकल्पातून कॉपर केबल करून चोरट्यांनी काळमदेव ते शनिमांडळ रस्त्यावरून पळ काढल्याची माहिती नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश भदाणे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने या चोरट्यांना पकडण्यासाठी सहकाऱ्यांच्या मदतीने शनिमांडळ गावाच्या पुढे सापळा रचला. याचवेळी त्यांना एमएच १८ बीझेड ३१३७ या गाडीवरून दोघे जण येताना दिसले. पोलिसांनी त्यांना पकडून चौकशी सुरु केली. त्यांच्याकडे केवळ`केबल व वजनकाटा असे साहित्य सापडले. यावेळी त्यांनी शकील लतिफ खाटीक (३९) व युनूस शहा हमीद शहा फकीर (३४, दोघेही रा. दोंडाईचा, जि. धुळे) अशी आपली नावे असल्याचे सांगितले. तसेच पाठीमागून एमएच ०४ एफए १८५२ या चारचाकी वाहनाने आणखी एक जण येत असल्याची माहिती दिली. ही गाडी आली त्यावेळी आधी पकडले गेलेल्या दोघांची चौकशी सुरू होती.
त्याचवेळी सदरील वाहन येताना दिसले. पोलिसांनी पाठलाग करून ती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्याने चक्क पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले. त्याने आपले नाव महेबूब लुकमान पिंजारी (३९, रा. दोंडाईचा) असल्याचे सांगितले. पोलिसांनी या तिघांसह त्यांची वाहने ताब्यात घेतली. पोलिसांनी या तिघांविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून ४६७ किलो कॉपर केबल, तीन मोबाईल व रोख रक्कम असा ८ लाख १५ हजार ३२५ रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हे आहेत कौतुकाचे मानकरी…
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे. पोलीस उपनिरीक्षक सुनील भामरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोतीराम भामरे, हेड कॉन्स्टेबल विनायक सोनवणे, राजेंद्र धनगर, सचिन सैंदाणे, अरुण चव्हाण यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली.



