चोरटे जोमात, शहादा पोलीस कोमात : आठ शेतीपंपांच्या केबलची चोरी; हाकेच्या अंतरावर चोऱ्या, पण पोलिसांना पत्ताच नाही

शहादा (सलाउद्दीन लोहार) : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कुकडेल शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या तब्बल आठ शेतीपंपांच्या केबल्स चोरून नेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शहादा शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या कुकडेल शिवारात चोरटे सक्रिय झालेले असताना शहादा पोलिसांच्या गुप्त वार्ता शाखेत कार्यरत कर्मचाऱ्यांना त्याचा थांगपत्ताही लागत नसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले असून, ऐन हंगामात शेतीपंपांविना शेती कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीश पाटील, उमाकांत पाटील आणि जगन्नारायण यांच्यासह इतर शेतकऱ्यांची कुकडेल शिवारात शेती आहे. सकाळी नेहमीप्रमाणे शेती कामासाठी हे शेतकरी शेतात गेले असता, त्यांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील शेतीपंपांची केबल चोरून नेल्याचे आढळले. प्रकरणी संबंधित शेतकरी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.
दरम्यान, दरवर्षी याच परिसरात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. केबल चोरीमुळे शेतीपंप बंद पडले असून शेतातील पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे. सध्या शेतात गहू व ज्वारीची पिके तोंडावर आलेली असताना आता शेतीला पाणी कसे द्यावे, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. वेळेवर सिंचन न झाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. केबल पुन्हा बसविण्यासाठी लागणारा खर्च परवडणारा नसल्याचेही या शेतकऱ्यांनी ‘नंदुरबार पोस्ट’ला सांगितले.
वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नियमित गस्त घालावी व चोरट्यांचा कडक बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच ग्रामीण भागातील शेतमाल व शेतीसाहित्य सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची गरज असल्याची अपेक्षाही या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.



