नंदुरबार जिल्हा

नवापूरवासियांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अनुभवला इतिहासाचा जिवंत जागर; गड-किल्ल्यांची प्रतिकृती साकारून विद्यार्थ्यांकडून शिवरायांच्या पराक्रमाला उजाळा

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरवासियांना इतिहासाचा जिवंत जागर अनुभवायला मिळाला. विशेष म्हणजे शिवजयंतीच्या निमित्ताने नवापूर नगर परिषदेने आयोजित केलेल्या शहरस्तरीय गड-किल्ले बांधणी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला आणि कार्याला उजाळा दिला.
नगरपालिका टाऊन हॉल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत इयत्ता पहिली ते बारावी तसेच खुल्या गटातील स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत विविध ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक व वास्तवदर्शी प्रतिकृती साकारल्या. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड आणि सिंधुदुर्ग किल्ला यांसह अनेक गड–किल्ल्यांचे मॉडेल्स सादर करण्यात आले. या प्रदर्शनाला शेकडो लोकांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थितांना गिरीदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट किल्ल्यांच्या प्रकारांची माहिती देत इतिहासाची गोडी जपली.
विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासपूर्ण दृष्टिकोन निर्माण करणे आणि महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. नवापूरच्या नागरिकांनीही या उपक्रमाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. इतिहासाचा अभिमान जागवणारा हा उपक्रम निश्चितच नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया या प्रदर्शनाला भेट दिलेल्या नवापूरवासियांनी व्यक्त केली. दरम्यान, स्पर्धेतील विजेत्यांना १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिनी स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button