नंदुरबार जिल्हा

नंदुरबार जिल्ह्याला सिकलसेलने घेरले; प्रशासन चिंतेत; हाती घेतली व्यापक तपासणी मोहीम; जानेवारीपर्यंत संपूर्ण लोकसंख्येच्या तपासणीचे टार्गेट

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनत असून, विशेषतः गर्भवती मातांवर या आजाराचा गंभीर परिणाम होत असल्याने जिल्हा प्रशासनाने व्यापक आणि नियोजित तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम आरोग्यदायी समाजाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
नंदुरबार जिल्हा येथील ० ते ४० वयोगटातील सुमारे साडेआठ लाख लोकसंख्येपैकी आतापर्यंत जवळपास निम्म्या म्हणजे चार लाख नागरिकांची सिकलसेल तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित नागरिकांची तपासणी जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. यासाठी दर महिन्याला ५० हजार नागरिकांची तपासणी करण्याचे नियोजन असून, ही मोहीम टप्प्याटप्प्याने प्रभावीपणे राबवली जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिली.
सिकलसेल तपासणीनंतर नागरिकांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येऊ नयेत किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास मार्गदर्शन व सहाय्य मिळावे, यासाठी जिल्हा रुग्णालयात विशेष कौन्सिलिंग सेंटर उभारण्यात आले आहे. या केंद्रामार्फत तपासणी अहवाल, प्रमाणपत्र प्रक्रिया, उपचार व पुढील सल्ला याबाबत नागरिकांना योग्य माहिती दिली जाणार आहे.
या मोहिमेमुळे सिकलसेल आजाराचे लवकर निदान, योग्य उपचार व जनजागृती साध्य होणार असून भावी पिढीला या आजारापासून वाचवण्यास मदत होणार आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button