नंदुरबार जिल्हा

गाव तसं चांगलं, पण पाण्यावाचून तहानलं!; चूलवडकरांचा (ता. धडगाव) टाहो; सरपंच, उपसरपंचांवर मनमानीचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, आता तुम्हीच लक्ष घाला

धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘गाव तसं चांगलं, पण वेशीवर टांगलं’, अशी मूळ मराठी म्हण आहे. पण धडगाव तालुक्यातील चुलवडच्या गावकऱ्यांवर मात्र ‘गाव तसं चांगलं, पण पाण्यासाठी तहानलं’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण स्वातंत्र्याची ७८ वर्षे पूर्ण झाली तरी चुलवड गावात अजूनही अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नदी, विहीर यांचा वापर करावा लागत आहे.
आता या मुद्द्यावर गावकऱ्यांनी एकत्र होत बिरसा फायटर्स संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेत हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. मुख्य म्हणजे दिलेल्या निवेदनात गावकऱ्यांनी सरपंच आणि उपसरपंचांवर विविध आरोप केले आहेत.
स्वातंत्र्याला अनेक वर्षे उलटल्यानंतरही चुलवड गावातील अनेक कुटुंबांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी नदी आणि विहिरींचा कुवाचा वापर करावा लागत आहे. महिलांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आहे. पाण्याची सोय करावी, यासाठी प्रत्येक ग्रामसभेत ग्रामस्थांकडून हा विषय काढून सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना पाण्याची व्यवस्था करून देण्याची आठवण करून दिली जाते. नाही म्हणायला यंदा १३ फेब्रुवारीपासून आतापर्यंत गावात २० हून अधिक बोअरवेल खोदण्यात आले. परंतु ते फक्त सरपंचांचे कार्यकर्ते किंवा निवडक आणि आवश्यकता नसलेल्या ठिकाणी खोदण्यात आले. काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था असूनही त्या ठिकाणी अवघ्या १० ते २० मीटर अंतरावर बोअरवेल खोदण्याचा पराक्रम करण्यात आला आहे. तसेच उपसरपंच राजेंद्र फोपऱ्या पावरा यांच्या घराच्या चारही कोपऱ्यांना बोअरवेल खोदण्याचे काम ग्रामपंचायतीने केले आहे. पण ज्या गावकऱ्यांना पाण्यासाठी नदी, विहिरींचा सहारा घ्यावा लागतो, अशा गरजूंचा मात्र या संदर्भात कोणताही विचार करण्यात आला नाही. गरजू गावकऱ्यांना दुर्लक्षित करून सरपंच व उपसरपंच संपूर्ण गावाचा पैसा आपापल्या कार्यकर्त्याच्या घराजवळ शौचालय, पाण्याची टाकी उभारणी, बोअरवेल खोदणे यासाठी खर्च करून मनमानी कारभार करीत आहेत, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच लक्ष घालून चुलवड गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणीही बिरसा फायटर्स संघटनेच्या या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन सादर करताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, शहादा तालुका कार्यकारिणीचे दिलीप मुसळदे, जगदीश डुडवे, मगन तडवी , वन्या तडवी, बोंडा पटले, बावाज्या तडवी, सायलीबाई तडवी, रेवलीबाई तडवी, बिजरा तडवी, कल्पना तडवी, सुशिलाबाई तडवी, जोबी तडवी, कुंदा तडवी, जोबीबाई तडवी यांच्यासह चूलवड गावातील १५ कार्यकर्ते उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button