नंदुरबार जिल्हा

नवापुरातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोन ट्रकवर आदळला सुसाट धावणारा ट्रक; चालकाचे नियंत्रण सुटल्याचा परिणाम; सुदैवाने जीवितहानी टळली

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ‘नवी होंडा’ परिसरात शुक्रवारी (दि. २०) पहाटे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुसाट धावणाऱ्या एका वाहनाला ऐनवेळी ब्रेक न लागल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्या वाहनाने समोरील दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी एका ट्रकचा चालक जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पहाटेची वेळ असल्याने या महामार्गावरून वाहने वेगात धावत होती. त्याचवेळी तांत्रिक बिघाडामुळे एका ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा ट्रक समोर असलेल्या दुसऱ्या दोन ट्रकवर आदळला. यामुळे पहाटेच्या वेळी जोरदार आवाज झाल्याने काही काळ महामार्गावर खळबळ उडाली होती.
अपघातग्रस्त वाहनांमध्ये ट्रक क्रमांक एमएच 06 एसी 6034, एमएच 16 सीडी 3080 आणि डीडी 01 ई 9414 यांचा समावेश आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एका वाहनाचा चालक निशालसिंग चौधरी (राजस्थान) जखमी झाला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच 1033 आपत्कालीन सेवेचे कर्मचारी, रुग्णवाहिकेचे चालक शरद वळवी, डॉ. रवींद्र वळवी तसेच हेल्पर सोमनाथ नाईक यांनी तातडीने मदतकार्य करत जखमी चालकाला नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासन यांच्या मदतीने काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button