कुंपणानेच शेत खाल्ले : नंदुरबारमध्ये शिक्षकानेच विद्यार्थिनीला पळवले; गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गुरु आणि शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नंदुरबार शहरातून समोर आली आहे. शहरातील एका नामांकित खासगी शाळेतील शिक्षकाने आपल्याच अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याचा खळबळजनक प्रकार घडला असून, यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या शिक्षकाविरोधात पोस्को कर`कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून नंदुरबार शहर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता हा शिक्षक पोलीस कोठडीची हवा खात आहे.
पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार उमेश अशोक शिंदे असे या शिक्षकाचे नाव आहे. उमेश शिंदे हा नंदुरबार शहरातील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. २७ जानेवारीला दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याने त्याच्याच शाळेतील विद्यार्थिनीला फूस लावून मोटारसायकलवर बसवून पळवून नेले. मुलगी शाळेतून परत न आल्याने दिवसभर वाट पाहिल्यानंतर मुलीच्या पालकांना चौकशीअंती मुलीला उमेश शिंदे याने पळवून नेल्याचे कळले. यांनतर मुलीच्या आईने २८ जानेवारीला पोलिसांत रितसर तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२), ३५१, २, ३, ७३ आणि पोस्को ११२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली.
दरम्यानच्या काळात उमेश शिंदे फरार होता. मात्र, पोलिसांनी वेगवान तपास करीत अखेर १६ फेब्रुवारीला त्याच्या मुसक्या आवळल्या. अटकेची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, या घटनेनंतर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आपल्या मुलांना ज्ञान मिळावे यासाठी शाळेत पाठवले जाते. शिक्षक या मुलांना ज्ञानरूपी वसा देऊन त्यांच्या आयुष्याला दिशा देतील, अशीच अपेक्षा ठेवून पालक आपल्या मुलांना शिक्षकांकडे सोपवतात. मात्र, काही शिक्षक आपल्याच विद्यार्थिनीला पळवून नेत असतील तर हा म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखा प्रकार आहे, अशा शब्दांत नंदुरबारचे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.



