राजकारण

लागा तयारीला : ८७ ग्रामपंचायतींचे कारभारी निवडीची प्रक्रिया सुरु; प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर; उद्यापासून प्रक्रिया

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नगर परिषदा आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता ग्रामपंचायतींचे कारभारी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींची लवकरच निवडणूक होऊ घातली असून, शासनाने त्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सर्वाधिक २७ ग्रामपंचायती शहादा तालुक्यातील असून, सर्वात कमी एकच ग्रामपंचायत अक्कलकुवा तालुक्यातील आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी दिली.
ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला उद्या, २० फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या अंतर्गत टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. २० फेब्रुवारीला तहसीलदारांनी गुगल अर्थचे नकाशे वापरून प्रत्येक ग्रामपंचायतींचा नकाशा निश्चित करणे, २७ फेब्रुवारीला तलाठी व ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्रभाग पडून सीमा निश्चिती करणे, ४ मार्च रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रभाग रचनेची पाहणी करतील, ११ मार्चला याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणे आणि हा प्रस्ताव तपासणी करून १७ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे असे या प्रक्रियेचे टप्पे असतील.
यानंतर ७ एप्रिलपासून प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा प्रक्रियेला सुरूवात होईल, पुढे हरकती मांडण्याचा अंतिम दिनांक, त्या हरकती, सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करणे, उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यावर सुनावणी घेणे, त्यावर अभिप्राय सुचवून मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणे आणि नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभाग रचना अंतिम करून शेवटी त्या राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याला अंतिम मान्यता देणे असा ४ मेपर्यंत हा कार्यक्रम चालेल.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील एकूण ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणूक जून महिन्यात पार पडतील असा अंदाज लावला जात आहे. यामध्ये अक्कलकुवा तालुक्यातील एक, धडगावमधील १६, तळोदा ७, शहादा २७, नंदुरबार २२, तर नवापूर तालुक्यातील १४ अशा एकूण ८७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button