नंदुरबार जिल्हा

नंदुरबार-विसरवाडी मार्गावर भीषण अपघात; चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दगावलेला युवक मूळचा चोपड्याचा

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : विसरवाडी ते नंदुरबार मार्गावर चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात ४१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ज्ञानेश्वर बाबुराव सरदार (४१, मूळ रा.चोपडा, जि. जळगाव) असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव असून, या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सरदार हा तरुण शनिवारी दुपारी होंडा युनिकॉर्न मोटारसायकलने (क्र. जी.जे.०५,एफ व्ही. ९९६९ ) विसरवाडीकडून नंदुरबारकडे चालला होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास खातगाव फाट्याजवळ अचानक समोरून आलेल्या भरधाव कारने (क्र.एम.एच.०१, बी.बी.१२७३) त्याच्या दुचाकीला जोरदर धडक दिली. या अपघातात सरदार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दोन्ही गाड्यांच्या धडकेमुळे झालेल्या जोरदार आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. विनामूल्य सेवा देणाऱ्या नाणिजधाम रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे क्षणाचाही विलंब न करता जखमी ज्ञानेश्वर यांना विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, चालक सुफियान अहमद मोहमद सलीम (रा.मालेगाव, जि. नाशिक) हा निष्काळजीपणाने भरधाव वेगात वाहन चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सुनील भाईदास शिरसाठ (रा. सुरत) यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिसांनी संशयित चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (२), १८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीशक नरंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र महने करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button