चांगली बातमी : क्षयरोग दुरीकरणात नंदुरबार राज्यात ठरले नंबर वन!; ९६ टक्के तपासण्यांसह अचूक निदान करून मृत्यूचे प्रमाणही घटवले
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२४-२५ या वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत नंदुरबार जिल्हा क्षयरोग विभागाने राज्यात पहिले स्थान पटकावला आहे. केंद्र शासनाने घोषित केलेल्या रँकिंगनुसार नंदुरबार जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे.
या निमित्ताने मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात नंदुरबार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते डॉ. चव्हाण यांना पुरस्कार व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य संचालक कादंबरी बालकवडे, सहसंचालक डॉ. राजरत्न वाघमारे आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत डॉ. महेंद्र चव्हाण यांच्यासह क्षयरोग विभागातील डॉ. सतीश नांद्रे, डॉ. जयेश सूर्यवंशी, डॉ. सचिन पाटील तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी, क्षयरोग अधिकारी, कर्मचारी आदींनी परिश्रम घेऊन हे अभियान यशस्वी केले. यामध्ये संशयित कष्टरुग्णांची तपासणी, सरकारी व खासगी रुग्णालयांत नवीन क्षयरुग्णांचा शोध घेणे, क्षयरुग्णांची एच.आय.व्ही. व डायबिटीस तसेच अन्य तपासण्या, त्यांना पोषण आहाराचा पुरवठा आदी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या मापदंडानुसार काम करण्यात आले.
उद्दिष्टपूर्ती
राष्ट्रीय दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारने २०२५ या वर्षासाठी सर्व जिल्ह्यांसाठी उद्दिष्ट निश्चित केले होते. नंदुरबार जिल्हा क्षयरोग विभागाने हे उद्दिष्ट पूर्ण करताना ७३ हजार ९१५ संशयित क्षयरुग्णांची तपासणी केली. नंदुरबार जिल्ह्यात २०२३ या वर्षात क्षयरोगामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण तब्बल ६ टक्के होते. मात्र, योग्यवेळी निदान आणि तातडीने उपचार यामुळे २०२५ या वर्षात हे प्रमाण २ टक्क्यांनी कमी करण्यात क्षयरोग विभागाला यश आले. यामध्ये २ हजार ९९२ पैकी २ हजार २७८ रुग्णांना ठणठणीत बरे करण्यात यश आले.
असे ठरले नंबर वन
शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत सरासरी ९६ ते १०० टक्के काम करण्यात यश मिळविल्याने नंदुरबार जिल्हा क्षयरोग विभाग राज्यात पहिल्या स्थानी आला आहे. ७ डिसेंबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८८ हजार १८५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ३५ हजार ०४० संशयित रुग्णांची एक्स रे तपासणी करण्यात आली. क्षयरोग निदान कार्यक्रमासाठी क्षयरोग विभागाने २७० ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांतून १३ हजार ४६० रुग्णांची एक्स रे तपासणी करून तत्काळ निदान करण्यात यश मिळविण्यात आले, अशी माहिती डॉ. महेंद्र चव्हाण यांनी दिली.



