गुन्हे वार्ता

मोठी कारवाई : २.५० लाखांची लाच घेताना शहादा पं.स.चा कनिष्ठ सहायक ‘एसीबी’च्या जाळ्यात; तक्रारदाराच्या बाजूने अहवाल देण्यासाठी मागितले होते पैसे

शहादा (सलाउद्दीन लोहार) : शहादा पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहायक अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाच्या जाळ्यात सापडला आहे. अभिजित गोवर्धन भावसार (३३) असे या लाचखोर कनिष्ठ सहायकाचे नाव असून, तक्रारदार ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून लाचेचे पैसे स्वीकारताना ‘एसीबी’ने त्याच्यावर झडप घातली. या प्रकरणामुळे शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात येथे कलम 7, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करून आरोपी अभिजित भावसार याला अटक करण्यात आली आहे.
असे आहे प्रकरण
या प्रकरणातील तक्रारदार (४२) हे जुलै 2024 ते जुलै 2025 या कालावधीत ग्रामपंचायत काथर्दा येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांबाबत भ्रष्टाचाराचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी पंचायत समिती कार्यालय, तळोदा यांच्यामार्फत करण्यात आली. मात्र, या चौकशीचा अहवाल मोघम स्वरूपात असल्याने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भात शहादा पंचायत समितीकडून स्पष्ट अभिप्राय मागविला होता.
ही चौकशी प्रक्रिया हाताळण्याची जबाबदारी अभिजित भावसार याच्याकडे होती. याचाच गैरफायदा घेत आरोपीने तक्रारदारास २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी पंचायत समिती कार्यालय, शहादा येथे बोलावून घेतले. यावेळी त्याने चौकशी अहवाल तक्रारदाराच्या बाजूने पाठविण्याचे आमिष दाखवत त्या बदल्यात २ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
हॉटेल स्पाईस अँड ग्रिलजवळ अडकला जाळ्यात
पैशांची मागणी केल्यानंतर भावसार याने तक्रारदाराला लाचेचे पैसे घेऊन शहादा येथील हॉटेल स्पाईस अँड ग्रिल परिसरात येण्यास सांगितले होते. दरम्यानच्या काळात तक्रारदाराने नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने तातडीने सापळा रचून लाचेची पैसे स्वीकारताच हॉटेलच्या परिसरात अभिजित भावसार याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २०० रुपये रोख, लाचेचे २.५० लाख रुपये, मायस्ट्रो दुचाकीची चावी आणि सॅमसंग कंपनीचा एस २ अल्ट्रा मोबाईल असा ऐवज आढळला. पथकाने तो ताब्यात घेतला. आरोपीची घरझडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचेची मागणी, स्वीकार व इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू आहे.
सापळा कारवाईचे पथक
ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास लोंढे, सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील यांच्यासह एसीबीच्या पथकाने केली. तपास अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक प्रशांत मरते काम पाहत असून, या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरग यांचे मार्गदर्शन लाभले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button