गुन्हे वार्ता

नवापूर तालुक्यात भरधाव कारचा भीषण अपघात; एका तरुणाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; गाडीत सापडले दारूचे बॉक्स; तस्करीचा संशय

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 53 वर भरधाव वेगात धावणाऱ्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला. यात एका तरुणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघाताचे थरारक दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, अपघातानंतर कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूचे खोके आढळल्याने दारू तस्करीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइल पेट्रोल पंपांदरम्यान ही दुर्घटना घडली. लाल रंगाची स्विफ्ट कार (क्रमांक GJ-26-AB-4424) अतिवेगात जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्यावर तीन ते चार वेळा उलटली आणि क्षणात चक्काचूर झाली. हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचे तुकडे रस्त्याच्या कडेला दूरवर फेकले गेले.
या अपघातात गुजरातमधील उकई सोनगड येथील आकाश आधारभाई पाटील आणि रोहित राजू वाघ हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस व स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचारादरम्यान आकाश पाटील याचा झाला, तर रोहित वाघ याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
थरार सीसीटीव्हीत कैद
या अपघाताचा थरार अपघातस्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे. कार भरधाव वेगात येताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पलट्या घेताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या फुटेजच्या आधारे अपघाताचे नेमके कारण, वेग, तसेच दारू वाहतुकीचा तपशील तपासला जात आहे.
गाडीत दारूचे बॉक्स
अपघातानंतर वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये देशी दारूच्या बाटल्यांचे मोठ्या प्रमाणात खोके आढळून आले. त्यामुळे ही कार दारू तस्करीसाठी वापरली जात होती का, असा संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र-गुजरात या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात दारूच्या अवैध वाहतुकीचे प्रकार वारंवार उघडकीस येत असून, यावेळी देखील अपघातग्रस्त कारमध्ये दारूचे बॉक्स आढळल्याने या प्रकरणी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात व अवैध धंद्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विसरवाडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, दारू तस्करीचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचतात का, याचाही शोध घेतला जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button