नंदुरबारमध्ये सार्वजनिक वीज वितरणाचे तीनतेरा; तारा लोंबकळलेल्या, विद्युत वाहिन्या जीर्णावस्थेत, स्ट्रीट लाईट बंद; युवा सेना आक्रमक

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरात सार्वजनिक वीज वितरणाचा बोऱ्या वाजला आहे. जागोजागी विजेच्या तारा लोंबकळलेल्या, अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या जीर्णावस्थेत दिसत आहेत. काही भागात स्ट्रीट लाईट देखील बंद असून, जिल्हा युवा सेनेने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना या विषयात तातडीने लक्ष घालून समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. युवा सेनेच्या निवेदनानंतर महावितरणच्या वतीने या विषयावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
शहरातील मुख्य वसाहत असलेल्या साई बालाजी नगर तसेच परिसरातील स्ट्रीट लाईट बंद आहेत. या ठिकाणी विद्युत तारांचे काम पूर्ण झालेले नाही. विद्युत रोहित्र रस्त्यावर बसविण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची परिस्थिती आहे. तसेच महाराणा प्रताप नगर, छत्रपती हॉस्पिटल परिसर, मारुती नगर, मधुबन नगर, अनिल नगर, काकासाहेब नगर, कामनाथ महादेव नगर, कुंभारवाडा, गवळीवाडा, संजय नगर, स्वराज्य नगर, मोठा मारुती टेकडी परिसर यासह अनेक कॉलनी व वसाहतींमध्ये विद्युत रोहित्र, विद्युत खांब व विद्युत वाहिनी यांची अवस्था जीर्ण झाली आहे. काही ठिकाणी तारा लोंबकळत आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असून, त्याची तत्काळ देखभाल व दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे युवा सेनेच्या निवेदनात म्हटले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपूत, युवती सेना जिल्हाप्रमुख राजश्री मराठे, उपजिल्हाप्रमुख राजरत्न बिरारे, शहर प्रमुख बंटी सूळ, उपशहर प्रमुख दुर्गेश शिरसाट, कल्पेश राजपूत, अमर वळवी, स्वप्नील पाटील, अक्षय गवळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन कार्यकारी अभियंता अतुल गायधनी यांना सादर केले. या निवदेनावर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपूत यांनी कार्यकारी अभियंता गायधनी यांच्याशी प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने चर्चा केली. यावर गायधनी यांनी युवा सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सदर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.



