‘दारूमुक्त नंदुरबार’साठी प्रयत्न करणारे डॉ. कृष्णा भावले ठरले ‘आरोग्य रत्न’; मुंबईत झाला विशेष गौरव

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर येथील मूळचे रहिवाशी आणि नंदुरबार व धुळ्यासह सातपुडा पर्वतरांगांमध्ये दारूमुक्तीसाठी विशेष प्रयत्न करणारे डॉ. कृष्णा रामचंद्र भावले यांना महाराष्ट्र शासनाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे.
रविवारी (दि.२२) रोजी मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातील व्यसनमुक्ती कार्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते रुपये १ लाख आणि सन्मान चिन्ह पुरस्कार डॉ. भावले यांना २०२४-२५ या वर्षासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी त्यांचा सपत्निक सन्मान करण्यात आला. त्यांच्या पत्नी डॉ. सारिका लांडगे या छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य सेवेत साथरोग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अतुलनीय कार्य
डॉ.कृष्णा भावले छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असून २००९ पासून गरीब, गरजू, ग्रामीण आणि विशेषतः नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांतील आदिवासी क्षेत्रात “दारूमुक्त घर -दारूमुक्त गाव अभियान ” ही व्यसनमुक्ती मोहीम राबवित आहेत. २२ हजार आदिवासी परिवारांसाठी व्यसनमुक्ती उपचार, प्रसार-जनजागृती कार्यक्रम आदिवासी गाव आणि पाड्यात मोफत उपचार सेवा देत आहेत. दीड लाख परिवार या अभियानाला जोडले गेले आहेत. आदिवासी परिवाराच्या निःशुल्क निवासी उपचारासाठी २५ खाटांचे व्यसनमुक्ती केंद्र सातपुडा आदिवासी क्षेत्रात उभे केले जात आहे. तसेच त्यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर येथे देखील गरजू परिवारांसाठी उपचार मोहीम राबविली जात आहे.
डॉ. कृष्णा भावले यांचा मुंबईत विशेष सत्कार झाल्यानंतर छत्रपती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी (दि. २४) त्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.



