तळोदा न.प.वर ‘लक्ष्मी’ रुसली : दोनदा नोटिसा देऊनही ठेकेदार ‘लक्ष्मी’ सोलार पथदिवे दुरुस्त करेना; मनमानीला सारेच वैतागले!

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कोट्यवधी रुपये खर्च करून तळोदा शहरात बसविण्यात आलेले सोलार पथदिवे बहुतांश वेळा बंद राहत असून, यामुळे या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेची जबाबदारी असलेली ठेकेदार कंपनी या कामाकडे साफ दुर्लक्ष करीत असून, नगर पालिकेने दोन वेळा या संदर्भात नोटीस बजावूनही ठेकेदाराने त्याला प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे नगर परिषद प्रशासन या ठेकेदाराला पाठीशी तर घालत नाही ना, असा प्रश्न तळोदा शहरवासीय करीत आहेत.
शहरातील प्रभाग क्रमांक १ ते ३ आणि प्रभाग क्रमांक ७ ते ९ मध्ये सोलार पथदिवे बसविण्यात आले आहेत. महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) या योजनेअंतर्गत ही सोलार पथदिवे बसविण्याचे कामे करण्यात आली आहेत. या योजनेस सप्टेंबर २०२४ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रत्येक कामासाठी ९९ लाख ९९ हजार ८२८ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सहा प्रभागांमध्ये सुमारे २ कोटी रुपयांच्या निधीतून सोलर स्ट्रीट लाईट बसविण्यात आले. लक्ष्मी इलेक्ट्रिकल अँड इंजिनियरिंग सर्व्हिसेस व प्रथमेश पावरटेक या एजन्सींना हे काम देण्यात आले होते. दोन्ही एजन्सींकडे या कामाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे.
मात्र, हे काम झाल्याच्या दिवसापासूनच अनेक लाईट्स सुरू न होणे, काही दिवसांत बंद पडणे, बॅटरी व तांत्रिक दोष आढळणे अशा समस्या सुरू झाल्या. त्यामुळे ठेकेदाराला देण्यात आलेल्या किमतीच्या तुलनेत लाईटचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप केला जात आहे. तळोदा नगर परिषदेकडून या कामाचा कार्यारंभ आदेश १० ऑक्टोबर २०२४ रोजी देण्यात आला होता. या कामासाठी पाच वर्षांचा दोष दायित्व कालावधी लागू असून त्या काळात देखभाल व दुरुस्ती करणे ठेकेदारांवर बंधनकारक आहे.
दोनदा नोटीस, तरी दुर्लक्ष
हे काम पूर्ण झाल्यापासून अनेक ठिकाणी पथदिवे बंदच असल्याने नगर परिषद प्रशासनाने अखेर ५ जानेवारी २०२६ रोजी लक्ष्मी इलेक्ट्रिकल अँड इंजिनियरिंग सर्व्हिसेस व प्रथमेश पावरटेक या एजन्सींना नोटीस बजावली. यानंतर ठेकेदारांनी काही ठिकाणच्या दिव्यांच्या बॅटऱ्या दुरुस्तीच्या नावाखाली काढून नेल्या. मात्र, महिना उलटून गेल्यावरही त्या दुरुस्त करून पुन्हा बसविण्याची तसदी घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे याबाबतीतील समस्या मांडणाऱ्या स्थानिकांचे म्हणणे कुणी ऐकून घ्यायलाही तयार नव्हते. तरीही लोकांनी तक्रारी मांडणे सुरूच ठेवले. अखेर या तक्रारींचा ओघ वाढूच लागल्यावर अखेर १३ फेब्रुवारीला नगर परिषदेने दोन्ही ठेकेदारांना पुन्हा तातडीची दुसरी नोटीस बजावली. त्यानंतर काही ठिकाणी थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली; मात्र अनेक भागांतील सोलार पथदिवे आजही बंद अवस्थेत आहेत. फक्त तक्रार आलेल्या ठिकाणीच काम करणे आणि उर्वरित बंद दिव्यांकडे दुर्लक्ष करणे, अशी ठेकेदारांची भूमिका असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात असून, प्रचंड खर्च करून बसविण्यात आलेल्या या सोलार पथदिव्यांच्या या योजनेच्या हेतूला ठेकेदारांच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे हरताळ फासला गेल्याची खुलेआम चर्चा सध्या तळोदा शहरात सुरू आहे. सोबतच या संदर्भात नगर परिषद कडक भूमिका घेत नसल्याने नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील पथदिवे तातडीने सुरू करण्यासंदर्भात संबंधित ठेकरदाराला आतापर्यंत दोनदा नोटिसा बजावण्यात आली आहे. काही ठिकाणी ठेकेदाराने पथदिव्यांची दुरुस्ती केली आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही काम बाकी आहे. या कामात प्रगती आणि समाधानकारक काम न झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच हे काम दुसर्याकडून पूर्ण करून घेण्यात येईल आणि त्याचा खर्च ठेकेदार कंपन्यांच्या बिलातून वसूल केला जाईल.
- विक्रम जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषद तळोदा



