महावितरण देणार ‘स्मार्ट शॉक’ : वीज बिल थकल्यास पुरवठा होणार ‘ऑटो डिस्कनेक्ट’; मीटरच्या छेडछाडीलाही लगाम
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : महावितरणकडून केल्या जाणाऱ्या विजेचे बिल विशिष्ट तारखेपर्यंत थकीत ठेवणे किंवा त्या तारखेनंतरही न भरणे आता वीज ग्राहकांना महागात पडणार आहे. कारण यापुढे अशा वीजबिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा ‘ऑटो डिस्कनेक्ट’ करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. या अंतर्गत वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन स्मार्ट मीटरच्या माध्यमातून रिमोट कंट्रोलच्या साह्याने खंडित केला जाणार आहे.
ही रिमोट ऑपरेशन मोहीम २० फेब्रुवारीपासून राज्यभरात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत स्मार्ट मीटर बसविलेल्या वीज ग्राहकांनी त्यांची वीज बिलाची रक्कम विहित कालावधीत न भरल्यास संगणक प्रणालीच्या आधारे त्यांचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात आहे. अर्थात, वीज पुरवठा खंडित करण्याआधी स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये वीज बिल थकल्याची नोंद होताच संबंधित ग्राहकाला शॉर्ट मेसेज सर्व्हिस (एसएमएस) द्वारे त्याची कल्पना दिली जाते. यानंतर बिल भरण्याचा शेवटचा दिवस उलटल्यानंतरही ग्राहकाने थकीत बिल न भरल्यास रिमोट कंट्रोलच्या साह्याने त्याचा पुरवठा खंडित केला जातो. तशी यंत्रणाच स्मार्ट मीटरमध्ये बसविण्यात आली आहे.
थकबाकी भरल्यानंतर पुन्हा रिमोट पद्धतीने संबंधित ग्राहकाचा वीज पुरवठा पूर्ववत चालू केला जातो. वाढत्या वीजबिल थकबाकीच्या पार्श्वभूमीवर अमलात आणण्यात आलेल्या या प्रणालीमुळे महावितरणच्या मनुष्यबळाचा वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचत असून थकबाकीवर नियंत्रण येण्यातही मदत मिळत असल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली.
मीटरची छेडछाडही कंट्रोलमध्ये
महावितरणच्या वतीने घरोघरी बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट आहे. मीटरमध्ये छेडछाड झाल्यास त्याची माहिती तातडीने या पोर्टच्या माध्यमातून महावितरणच्या सर्व्हरला पोहोचते. या सर्व्हरवर २४ तास लक्ष ठेवले जात असल्याने या वीजचोरीवर तातडीने कारवाई केली जाते. यामुळे वीजचोरीच्या प्रकारांना मोठा आळा बसला असल्याचेही महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.
स्मार्ट मीटर ही अत्यंत आधुनिक प्रणाली आहे. यामुळे बिलाची अचूक नोंद होते. त्याचा फायदा ग्राहक आणि महावितरण कंपनी या दोघांनाही होणार आहे. या प्रणालीमुळे ग्राहकांना दिवसभराच्या वीज वापरावर तब्बल ८० पैसे प्रति युनिट सूट मिळत आहे. शिवाय या स्मार्ट मीटरमुळे वीज वापरावर नियंत्रण देखील आले आहे.
- ज्ञानेश्वर आर्दड (जनसंपर्क अधिकारी, महावितरण कंपनी)



