नंदुरबार जिल्हा

कुत्रे झाले, आता सांडांचा उच्छाद; शहादा बसस्थानक परिसरात खुलेआम धुमाकूळ; निष्पाप जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार का?

शहादा (सलाउद्दीन लोहार) : शहादा शहरातील मोकाट कुत्र्यांनी एका चिमुकलीसह काही जणांचे लचके तोडण्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच आता शहरात अनेक ठिकाणी मदमस्त मोकाट सांडांनी धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. शहरातील बस स्थानक परिसर, बाजारतळ तसेच अन्य गर्दीच्या परिसरात हे मदमस्त सांड परस्परांशी झुंजत असून, त्यांच्या झुंजीत त्या ठिकाणी उपस्थितांच्या जीवाला मात्र घोर लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहादा शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला असून, नगर परिषद प्रशासन मात्र याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात शहादा शहरातील सराफा बाजार परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्यांना टार्गेट करीत मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या शरीराचे होते. या मोकाट कुत्र्यांच्या एक दहा वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली होती. सुदैवाने वेळेवर उपचार मिळाल्याने त्या चिमुकलीचे प्राण वाचले.
ही घटना ताजी असतानाच आता शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट सांडांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी बाजाराचा दिवस असल्याने सकाळी परिसरात मोठी गर्दी होती. त्याचवेळी या ठिकाणी मदमस्त सांड आपसांत मोकाटपणे झुंजत होते. या सांडांचा जोरदार धिंगाणा सुरू असल्याने अवचित घडण्याच्या भीतीने पादचारी आणि प्रवाशांच्या जिवाला घोर लागला होता. आठवडे बाजार असल्याने सकाळी गर्दीच्या वेळेतच हे मोकाट प्राणी आपसांत मोकाटपणे झुंजत होते. लोकांच्या अंगावर धावून जात होते.
मात्र हा प्रकार रोखण्यासाठी, त्या सांडांना हुसकावण्यासाठी नगर परिषदेचा एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. शहरातील बसस्थानक परिसरात विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची नेहमीच ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी नगरपालिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
कोंडवाडे आहेत की नाही?
शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला असताना आणि ही मोकाट जनावरे लोकांचा जीव घ्यायला टपलेले असताना नगर परिषद मात्र हा विषय गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे. याआधी नगर पालिकेचे कर्मचारी शहरातील मोकाट जनावरे पकडून त्यांना पालिकेच्या स्वतंत्र कोंडवाड्यात डांबायचे. मात्र सध्या अशी कारवाईच होताना दिसत नाही. शिवाय पालिकेचे कोंडवाडेही अस्तित्वात आहेत की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. कोंडवाडा उपलब्ध असेल तर ही मोकाट जनावरे तत्काळ पकडली का जात नाहीत, पालिकेचा अतिक्रमण विभाग किंवा संबंधित पथक या गंभीर विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. शहरात फिरणारी बहुतांश मोकाट जनावरे ही पाळीव असून त्यांचे मालक त्यांना रस्त्यावर सोडून देतात.अशा जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करावी, मोकाट जनावरे जप्त करून ती कोंडवाडे किंवा गोशाळेत हलवावीत, अशी मागणी करतानाच स्थानिकांकडून “एखादा निष्पाप जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही केला जात आहे. शाळा, बाजारपेठ आणि बस स्थानक या गर्दीच्या ठिकाणी पालिकेने विशेष पथक नेमून तात्काळ नियंत्रण मोहीम राबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिक त्रस्त नागरिकांनी दिला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button