शहादा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची बत्ती गुल; अवघे ४,३५० रुपयांचे वीजबिल न भरल्याचा फटका; अंधारात कामकाज; शेतकरी,नागरिक हैराण
शहादा (सलाउद्दीन लोहार) : अवघ्या ४ हजार ३५० रुपयांचे वीजबिल न भरल्याने शहादा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची वीज खंडित करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी, कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात काम करण्याची वेळ आली असून, ही कामे लवकर होत नसल्याने कृषी योजनांसाठी येणारे शेतकरी व नागरिकांना कामासाठी ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहादा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दररोज शेतकऱ्यांच्या विविध योजना, अनुदान प्रस्ताव, पीक विमा, ई-पीक नोंदणी तसेच ऑनलाइन प्रणालीद्वारे कामकाज चालते. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील संगणक, इंटरनेट व प्रिंटर पूर्णतः बंद पडले असून संपूर्ण ऑनलाइन व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे दूरवरून आलेल्या शेतकऱ्यांना कामाअभावी रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
विशेष म्हणजे एवढ्या महत्वाच्या कार्यालयाचे अवघ्या काही हजार रुपयांचे बिल वेळेत न भरल्यामुळे ही नामुष्की ओढवल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन करणारे कार्यालयच अंधारात असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकरणात शहादा तालुका कृषी अधिकारी कार्यालय प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले की संबंधित कर्मचाऱ्यांची हलगर्जीपणा कारणीभूत आहे, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांकडून वेळेवर कागदपत्रे, शुल्क आणि अटींची पूर्तता करून घेतली जाते, प्रशासन मात्र स्वतः मूलभूत जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, संबंधित विभागाने तात्काळ थकीत वीजबिल भरून वीजपुरवठा सुरळित करून घ्यावा. तसेच या प्रकाराला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करतानाच तसे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.



