नंदुरबार जिल्हा

विहिरी पूर्ण तरी ‘कुशल’चे पैसे मिळेना; धडगाव तालुक्यातील प्रकार; दागिने विकून काम करणाऱ्या मजुरांचा संयम सुटला; आत्मदहनाचा इशारा

धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव तालुक्यात प्रशासकीय दिरंगाईचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सन २०२२-२३ या वर्षात मंजूर झालेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे काम पूर्ण होऊनही हे काम करणाऱ्या मजुरांचा ‘कुशल’ मजुरीचा निधी गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. यामुळे हे मजूर आणि शेतकरी संतापले असू, त्यांनी बुधवारी धडगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात धडक दिली. “घरातील सोने-चांदी गहाण ठेवून, कर्ज काढून विहिरी पूर्ण केल्या, आता कर्ज कसे फेडायचे?” असा संतप्त सवाल विचारत या सर्वांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व आत्मदहनाचा इशारा दिला.
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी २०२२-२३ मध्ये प्रशासनाच्या वतीने ५१ सार्वजनिक विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. या विहिरींचे काम मजुरांनी अत्यंत कष्टाने पूर्ण केले. तहसीलदार स्तरावरून या कामांचा पूर्णत्वाचा अहवालही सादर झाला असून ऑनलाइन नोंदीही पूर्ण झाल्या आहेत. या कामाची अकुशल मजुरी या मजुरांना अडा करण्यात आली असली तरी बांधकामाच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या ‘कुशल मजुरी’च्या निधीला अद्यापही प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही मजुरी अद्याप या मजुरांच्या खात्यात जमा होऊ शकलेली नाही.
वारंवार जिल्हा आणि तालुका स्तरावर चकरा मारूनही केवळ आश्वासने मिळत असल्याने अखेर बुधवारी या मजुरांच्या संयमाचा बांध फुटला. शेकडो मजूर आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत पंचायत समिती गाठली आणि गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे ‘तांत्रिक अडचण’ असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला, ज्यामुळे उपस्थित सारेच झाले.
अनेक मजुरांनी विहिरीचे काम पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या पत्नीचे सोने-चांदीचे दागिने विकले आहेत. काहींनी खासगी कर्ज काढून सिमेंट व इतर साहित्याची खरेदी केली. मात्र, दोन वर्षांहून अधिक कालावधीपासून मजुरीचे पैसे न मिळाल्याने कर्जाचे व्याज वाढत चालले आहे. कर्ज देणाऱ्यांकडून वसुलीसाठी तगादा सुरू आहे. घाम गाळून काम करूनही आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मजुरीचे पैसे तातडीने न मिळाल्यास आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, अशा शब्दांत या मजूर व शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना आपबिती समजावत इशाराही दिला.
‘नरेगा’ अधिकारी आणि कर्मचारी दरवेळी तांत्रिक कारणांचे नाव पुढे करून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप यावेळी मजुरांनी केला. दरम्यान, प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे संतापलेल्या मजुरांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला असून, काहींनी तर थेट टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button