धडगाव न.पं.च्या नव्या कर आकारणीला स्थगिती; शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी अन् आ. चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला यश
धडगाव (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : धडगाव येथील नगर पंचायतकडून आकारण्यात आलेल्या नव्या करांच्या वसुलीला अखेर राज्य शासनाने अखेर तात्पुरती स्थगिती दिली आहे. नवीन कर आकारणीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली होती. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात आवाज उठवतानाच याबाबत आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे धाव घेत दखल घेण्याची मागणी केली होती. आ. रघुवंशी यांनी या विषयावर तत्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. यानंतर नवीन कर आकारणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.
नगरपंचायत धडगाव वडफळ्या रोषमाळ (बु.) हे क्षेत्र पूर्णतः आदिवासी व दुर्गम भागात येत असून, येथील बहुतांश नागरिक दारिद्रय् रेषेखालील आहेत. या भागात उद्योगधंदे, रोजगाराची साधने अत्यल्प आहेत. येथील स्थानिक रहिवाशांचा मुख्य उदरनिर्वाह शेती व मजुरीवर चालतो. असे असतानां येथील नगर पंचायतीच्या वतीने विविध प्रकारचे कर आकारले जात आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्थानिक नागरिकांना हे कर भरणे अत्यंत कठीण जात आहे. रोजगाराच्या अभावामुळे व उत्पन्नाचे मर्यादित स्रोत असल्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यातच नगर पंचायतीच्या वतीने नवीन करांची आकारणी सुरू करण्यात आली होती.
ही बाब लक्षात घेता नगरपंचायत धडगाव वडफळ्या रोषमाळ (बु.) येथील नविन कर आकारणीस तात्पुरती स्थगिती देण्यात यावी तसेच आदिवासी नागरिकांना योग्य ती सवलत मिळावी यासाठी माजी जि.प सदस्य, ज्येष्ठ पदाधिकारी विजय पराडके, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील यांनी शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांना दखल घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आ. रघुवंशी यांनी तत्काळ शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नवीन कर आकारणीला स्थगिती देण्याची मागणी केली. तसेच त्या संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर शिंदे यांनी देखील धडगाववासियांच्या दृष्टीने महत्वाच्या या विषयात तातडीने लक्ष घालत अखेर नवीन कर आकारणीस स्थगिती दिली. या पार्श्वभूमीवर धडगाववासियांच्या वतीने त्यांचे आभार मानले जात आहेत.



