नंदुरबार जिल्हा

नंदुरबारकर झाले स्मार्ट : ‘स्मार्ट’ मीटर बसवून वीजबिलाचे वाचवले ३३.१८ लाख रुपये; जळगाव परिमंडळात तब्बल दीड कोटींची बचत

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आदिवासींचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल ३७ हजार २१८ ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर बसविल्यामुळे तब्बल ३३ लाख १८ हजार रुपयांच्या बचतीचा फायदा झाला आहे. जळगाव परिमंडळाचा विचार करता स्मार्ट मीटर बसवलेल्या सव्वादोन लाखांहून अधिक घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरावर (टाइम ऑफ डे) गेल्या सात महिन्यांत दीड कोटींहून अधिक रकमेची सवलत वीजबिलात मिळाली असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी दिली.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ जुलैपासून सुरू झाला आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.
जळगाव परिमंडलात २ लाख ३३ हजार २०९ घरगुती ग्राहकांना जुलै-२०२५ ते जानेवारी-२०२६ या सात महिन्यांच्या वीजबिलात १ कोटी ६३ लाख ३२ हजार रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे. जळगाव मंडलातील १ लाख ३७ हजार १७७ ग्राहकांना ८९ लाख ९० हजार, धुळे मंडलातील ५८ हजार ८१४ ग्राहकांना ४० लाख २४ हजार तर नंदुरबार मंडलातील ३७ हजार २१८ ग्राहकांना ३३ लाख १८ हजार रुपये सवलत मिळाली आहे.
नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होत असल्याने अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येणार आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीजवापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.
टाईम ऑफ डे (टीओडी) प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू आहे. महावितरणकडून सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टीओडीनुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे. यात १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, २०२६-२७ मध्ये 85 पैसे, २०२७-२८ व २०२८-२९ मध्ये ९० पैसे तसेच २०२९-३० मध्ये १ रुपया प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसवणे अत्यावश्यक आहे.
ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. टीओडी मीटर असल्याशिवाय घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराची सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी स्मार्ट टीओडी मीटर बसविण्याकामी महावितरण आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता मुलाणी यांनी केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button