नवापूर हादरले : शारीरिक अत्याचारानंतर ५५ वर्षीय महिलेची हत्या; विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील घटना; संशयित युवक ताब्यात
नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील गंगापूर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात ५५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाणे पोलिसांनी २५ वर्षीय संशयित युवकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
मंगळवारी (दि. २४) सायंकाळच्या सुमारास संबंधित ५५ वर्षीय महिला घरातून बाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. याचदरम्यान नानगीपाडा रस्त्यालगत त्यांच्या चपला आढळून आल्या. पुढे जवळच असलेल्या ज्वारीच्या शेतात त्या गंभीर अवस्थेत आढळून आल्या.
महिलेवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत गुन्हा दाखल केला.
यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून एका २५ वर्षीय संशयित युवकाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.
या अमानुष घटनेमुळे नवापूर तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली असून, या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्याला कडक शासन मिळेपर्यंत पाठपुरावा करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.



