नंदुरबार जिल्हा

मोबाईलचा अतिरेक–नात्यांचा ब्रेक : विद्यार्थ्यांच्या रॅली- पथनाट्याने उघडले शहादावासियांचे डोळे!

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मोबाईलच्या अतिवापरामुळे नातेसंबंधांवर टोकाचे दुष्परिणाम परिणाम होत असून, याच अनुषंगाने गुरुवारी (दि.२६) शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी “एक मोबाईल – अनेक नाती तुटलेली” या विषयावर पथनाट्य व रॅलीचे आयोजन करून सर्वांचे डोळे उघडले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शहादा शहरातील विविध ठिकाणी प्रभावी पथनाट्य सादर करून मोबाईलमुळे कुटुंब, समाज व मानवी नातेसंबंधांवर होणारे दुष्परिणाम शहादावासियांसमोर मांडले. या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील होते. यावेळी नायब तहसीलदार आर. बी. राजपूत, शहादा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाघ, मंडळाचे संचालक रमाकांत (लड्डूभाई) पाटील, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास पाटील, पोलीस पाटील युवराज पाटील, प्रा. बी. टी. पाटील, संचालक ॲड. राजेश कुलकर्णी, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राजपूत, नगरपालिकेचे ग्रंथपाल चेतन गांगुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी दोंडाईचा रस्त्यावरील सप्तशृंगी मंदिर चौकात माता सरस्वती व स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर दीपक पाटील यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
ही रॅली सप्तशृंगी मंदिर चौक, स्टेट बँक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व नगर पालिकेजवळील जनता चौक येथे थांबली. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील संवाद कमी होणे, पती-पत्नी, पालक-मुले व मित्र-मैत्रिणींमधील नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणे, लहान मुलांचे मैदानी खेळांपासून दूर जाणे, एकलकोंडेपणा व मानसिक ताणतणाव वाढणे याबाबत प्रभावी संदेश दिला. रॅलीदरम्यान “मोबाईल सोडा, नात्यांना जोडा”, “हातात फोन, नात्यांत मौन”, “मोबाईलचा अतिरेक – नात्यांचा ब्रेक”, “फोनमध्ये हरवले, नाते मात्र रडले” अशा घोषणा व फलकांच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी अंतिम वर्षातील विद्यार्थी गणेश दीपक गिरासे याने उपस्थितांना मोबाईलचा अतिवापर टाळून नात्यांना वेळ देण्याची शपथ दिली. यावेळी उपनगराध्यक्षा माधवी पाटील, संचालक ॲड. राजेश कुलकर्णी व नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमल पाटील, समन्वयक मकरंद पाटील, संचालक मयूर पाटील व प्राचार्य डॉ. एस. पी. पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मृणाल पेंढारकर यांनी केले, तर आभार प्रा. नेत्रदीपक कुँवर यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अमृता पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button