शहादा तालुक्यातील पूल म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’; चारही पुलांची अवस्था खराब; वाहनधारकांसह सारेच वैतागले; प्रशासन घेतेय संयमाची परीक्षा

शहादा (सलाउद्दीन लोहार/ नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ ही मराठीतील उक्ती नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील पुलांच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. कारण या तालुक्यातील रहदारीच्या व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण मानले जाणारे चारही पुलांची अवस्था विदीर्ण असून, या खराब अवस्थेतील पुलांमुळे गेल्या दीड वर्षापासून वाहनधारक-नागरिक तसेच शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.
त्यातच डामरखेडा जवळील गोमाई नदीच्या पात्रात तात्पुरता तयार करण्यात आलेल्या कच्च्या रस्त्यावर सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी, ठप्प होणारी रहदारी तसेच कच्च्या रस्त्यावर झालेला मातीचा चिखल यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांचा संयम सुटत चालल्याने प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पहिला पूल
तालुक्यातील मुख्य रस्ता असलेल्या डामरखेडा गावाजवळील गोमाई नदीवरील पुलाची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामामुळे अवजड वाहतूक बंद करून प्रकाशा-काथर्दे -कलसाडी-पाडळदा-म्हसावद मार्गे वळविण्यात आली असून ती आजतागायत सुरू आहे.
सध्या डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवरील नादुरुस्त असलेल्या पुलाच्या बाजूला लागूनच विसरवाडी ते सेंधवा या राष्ट्रीय राज्य महामार्गावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. ठेकेदार हा पुलाचे बांधकाम संथ गतीने करत असल्याने लोकप्रतिनिधींनी आंदोलन केली होती. पुलाचे बांधकाम लवकर युद्धपातळीवर व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी या ठिकाणी भेटी देऊन ठेकेदाराला तंबी देखील दिलेली आहे. असे असले तरी या कमला वेग आलेला नाही, हे विशेष. जुन्या पुलावर अर्जंट वाहतूक सुरु असली तरी अरुंद पूल आणि त्यातच त्यावर असलेले मोठमोठे खड्डे यामुळे सातत्याने रहदारी ठप्प होत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.
दुसरा पूल
शहादा शहराला लागून तिखोरा जवळील गोमाई नदीवरील पूल पूर्ण जमीनदोस्त करून नव्याने बांधकाम सुरू आहे. हे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांचे हाल होत असले तरी या पुलाचे काम नक्की कधी पूर्ण होणार हे प्रत्यक्ष ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाहीत, अशी खुलेआम चर्चा तालुक्यात सुरू आहे. एवढा उशीर करूनही पुलाच्या कामाचा दर्जाही कसा राहील, याबाबत देखील शंका व्यक्त होत आहे.
तिसरा पूल
तिखोरा ते उंटावद गावा दरम्यान एका नाल्यावर छोटा पूल उभारण्यात आलेला असून, तो देखील पडक्या स्थितीत झाला आहे. प्रशासन या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेणार आहे का आणि असल्यास त्या कमला सुरुवात कधी होणार, याची उत्सुकता सर्वानाच लागून राहिली आहे.
चौथा पुल
वैजाली-नांदर्डे दरम्यान वाकी नदीवरील पूल गेल्या दोन वर्षापासून जमीनदोस्त झाला आहे. ज्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे वाहनधारकांसह येथून ये-जा करणारे नागरिक आणि शेतकऱ्यांना २० ते २५ किलोमीटर अंतराचा फेरा मारून जावे लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी कसरत करावी लागत आहे.



