पवित्र रमजान महिन्यातच अक्कलकुव्यात भिडले मुस्लिम बांधव; दोन गटांची परस्परांच्या घरात घुसून हाणामारी
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेला रमजान महिना सुरू असतानाच याच समाजातील दोन गटांनी परस्परांवर हल्ला चढवल्याची घटना अक्कलकुवा शहरात घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साबीरअली निसारअली मक्राणी आणि आलमजेब गुलाम हुसेन बलोच या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होता. दोन दिवसांपूर्वी या दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वादावादी झाली. काही मिनिटांतच या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी काही लोक जमा झाले आणि त्यांच्यातही हाणामारी सुरू झाली. या सात-आठ जणांनी परस्परांच्या घरात घुसून दिसेल त्याला मारहाण सुरू केली.
अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. प्रारंभी साबीरअली मक्राणी यांनी विरोधी गटाच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार मंजूर शेख, नासिर हुसेन बलोच, आलमजेब बलोच, रियाज अक्रम मक्राणी, मुजाहिद बलोच, इरफान बलोच, मुश्ताक हाजी, अलाउद्दीन बलोच यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर पाठोपाठ आलमजेब गुलाम हुसेन बलोच यांनीही विरोधी गटाविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार साबीरअली निसारअली मक्राणी, शोएबअली मक्राणी, अन्सारअली मक्राणी, निसारअली मक्राणी (सर्व रा. जमादारफळी) यांच्याविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



